म्हार्दोळ येथील रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे

वाहनचालकांच्या जिवाला धोका : रोगराई पसरण्याआधी कचरा उचलण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th April, 12:26 am
म्हार्दोळ येथील रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे

म्हार्दोळ येथील पोलीस स्थानकाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर दिसून येणारा कचरा.      

फोंडा : म्हार्दोळ येथील पोलीस स्थानकाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे वाहनचालकासाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावरील कचऱ्यामुळे भटक्या गुरांचा आणी कुत्र्याचा संचार वाढला आहे. कचऱ्यामुळे जवळीळ लोकांना रोगराई पसरण्याची भीती असून पंचायतीने रस्त्याच्या बाजूला पडून असलेला कचरा उचलण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.
पोलीस स्थानकाच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यावर ओल्या व सुक्या कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात अज्ञातांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात सर्वत्र प्लास्टिक दिसून येत आहे. रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या ओल्या कचऱ्यावर ताव मारण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा आणि गुरांचा संचार वाढल्याचे दिसून येत आहे. वाहनातून ये - जा करणारे अनेक लोक त्या रस्त्याच्या बाजूला कचरा टाकत असतात. परिसरात लोकवस्ती नसल्याने कचरा टाकणाऱ्यांना चांगली संधी मिळत आहे. वेलिंग - प्रियोळ पंचायतीतर्फे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकाखाली कचरा टाकण्यात येतो.
कचरा टाकण्यात येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला काही स्थानिक लोकांचे जाईचे मळे आहेत. कचरा टाकल्यानंतर काही जण कचऱ्याला आग लावतात. त्यामुळे कचऱ्याला लावलेली आग जाईच्या मळ्यात जावून मालकाचे नुकसान होत असते. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मगणी स्थानिक करीत आहेत.


पंचायतीतर्फे प्रत्येक घरातील कचरा उचलण्यात येतो. पण अनेक जण प्लास्टिक पिशव्यात भरून कचरा रस्त्याच्या बाजूला टाकत असतात. यापूर्वी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्या ५-६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. पंचायत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी यापूर्वी जागृती करण्यात लोकांना पत्रके वितरित करण्यात आली. पण अनेक लोक कचरा रस्त्याच्या बाजूला टाकत असल्याचे दिसून येते. स्थानिक लोकांनी कचरा टाकणाऱ्यांचे फोटो पंचायत कार्यालयात दिल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. लोकांनी पंचायतीला सहकार्य करावे.
हर्षा गावडे, सरपंच, वेलिंग - प्रियोळ पंचायत

हेही वाचा