दूधसागर धबधब्यावर बंगळुरू येथील पर्यटक बेपत्ता

कुळे पोलिसांत तक्रार दाखल; शोध सुरू


20th April, 12:25 am
दूधसागर धबधब्यावर बंगळुरू येथील पर्यटक बेपत्ता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : कुळे येथील दूधसागर धबधब्यावर गेलेला बंगळुरू येथील पर्यटक अब्दुल रफिक (६२) हा गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी कुळे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुळे पोलीस व वन खात्याचे कर्मचारी गुरुवारपासून बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा शोध घेत आहेत.
बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीचा मालक आपल्या पत्नीसह गोव्यात आला होता. गुरुवारी दुपारी कुळे येथून दूधसागर धबधब्यावर गेलेला पर्यटक पार्किंगस्थळावर उतरला. त्यावेळी त्याच्या पत्नीने शौचालयात जाण्यापूर्वी पर्स व अन्य साहित्य त्याच्याकडे दिले होते. शौचालयातून परतल्यानंतर पत्नीला तो दिसला नाही. पत्नीने धबधबा परिसरात शोधाशोध करूनही तो सापडला नाही. कुळे पोलीस स्थानकात तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जंगलात बेपत्ता पर्यटकाचा शोध घेतला. शुक्रवारी पुन्हा शोधकार्यास सुरुवात करण्यात आली. वन खात्याचे कर्मचारीही शोधकार्यात सहभागी झाले होते. कुळे पोलीस व वन खात्याचे कर्मचारी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा