गोमंतकीयांसाठी कोविड चाचणी शुल्कावर ‘एसईसी’ ठाम

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
18th May 2020, 09:50 am

पणजी : बाहेरून राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाकडून चाचणी शुल्क आकारण्यात यावे, याबाबत राज्य कार्यकारी समिती (एसईसी) ठाम आहे. सरसकट प्रत्येक गोमंतकीयाला या शुल्कातून सूट देण्यापेक्षा आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा सेवेतील सरकारी कर्मचारी यांनाच सूूट देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. राज्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी केली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवाशांना संदेश पाठवून सक्तीची सशुल्क चाचणी करावी लागेल, याची माहिती द्यावी, असेही समितीने ठरवले आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसईसीची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी आंतरराज्य मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वांनी ‘आरोग्य सेतू अॅप’ सक्तीने डाऊनलोड करावा, असेही निर्देश जारी करण्यात आले आहेत.
राज्यात २९ एप्रिल २०२० पासून १७,०८५ जण बाहेर गेले आहेत, तर २,१२९ लोकांनी राज्यात प्रवेश केला आहे. आत्तापर्यंत ३६ विशेष विमानाने ७,३५२ विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले आहे. १७८ कदंब बसगाड्या नागरिकांच्या सेवेसाठी तैनात आहेत. १,००७ लोकांवर मास्क न वापरल्याने आणि ६,४६० सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
दरम्यान, राज्यातील सीमेपलिकडे महाराष्ट्रातील सीमाभागात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीमेनजीकच्या शाळेत परीक्षा घेता येणे शक्य आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश शिक्षण सचिवांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा