म्हाशातील कुटुंबाचे आधार कार्ड बनावट?

घर क्र. ६७० अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट : कुटुंबांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह


16th May 2019, 06:26 pm


वास्को :
म्हापसा येथे वास्तव्यास असलेल्या परंतु आधार कार्डावर वास्को येथील पत्ता असलेल्या त्या स्थलांतरितांच्या कुटुंबांच्या दाव्याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कुटुंबाकडील आधार कार्डवरील पत्यात नमूद शांतिनगर भागात चौकशी केली असता घर क्र. ६७० अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. तसेच, या नावाचे कोणीही या भागात वास्तव्यास नसल्याचा दावा स्थानिकांनी केला.
या भागात राहिल्याचा दावा करणारे कुटुंब येथे कधीच वास्तव्यास नव्हते, तसेच फक्त ६७० क्रमांकाचे घरही या भागात अस्तित्वात नाही. यामुळे हे आधार कार्डच बनावट असू शकते, असा कयास येथील एका नागरिकाने व्यक्त केला.
दोन वर्षांपूर्वी एक स्थलांतरित कुटुंब रस्त्याच्या कडेला तंबू उभारून राहिले होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कुंड्या व इतर भांडी बनवण्याचे काम त्यांचे सदस्य करत होते. परंतु, म्हापशातील ते कुटुंब आणि येथे केवळ १५ दिवस वास्तव्यास असलेले कुटुंब यात काहीच साम्य नसल्याचे अन्य एका रहिवाशाने सांगितले.
आधार कार्ड बनवण्यासाठी विविध पुरावे लागतात. नमूद क्रमांकाचे घरच अस्तित्वात नसल्यास आधार कार्ड कसे काय मिळू शकते, असा सवाल एका नागरिकाने उपस्थि केला. एक तर आधार कार्ड बनावट असेल किंवा त्यात छापील चुका असतील. आधार कार्ड दिशाभूल करणारे आहे, असे मत त्याने व्यक्त केले.
...........................
बॉक्स
संबंधित नावाच्या कुटुंबाचे कधीच वास्तव्य नव्हते !
प्रस्तुत प्रतिनिधीने शांतिनगर येथे भेट दिली असता स्थानिकांनी या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करताना, या आधार कार्डच्या वैधतेबाबत शंका उपस्थित केली. या भागात सुमारे ३०० घरे असून, त्यातील २५ घरांना ६७० पासून सुरू होणारा घर क्रमांक आहे. परंतु, त्यात ६७०-ए, ६७०-बी असे विभाजन करण्यात आले आहे. या नावाचे कुटुंब येथे कधीही वास्तव्यास नव्हते, आणि त्यांचे चेहरेही ओळखीचे वाटत नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.