हळदोणे मार्केट प्रकल्पाची दुरवस्था


16th May 2019, 06:25 pm


झायरा नोऱ्होना

हळदोणे : हळदोणे येथे बांधण्यात आलेल्या पंचायत पातळीवरील मार्केट प्रकल्पाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळून पडेल, हे सांगता येत नाही.

मार्केट प्रकल्प फॅब्रिका ऑफ सेंट थॉमस चर्चच्या जागेत बांधण्यात आला आहे. ही जागा चर्चने हळदोणे पंचायतीला दीर्घ मुदतीच्या करारावर दिली होती. १९७२ मध्ये स्वत:चा मार्केट प्रकल्प असलेली हळदोणे ही गोव्यातील पहिली पंचायत होती. प्रकल्प ग्रामीण विकास एजन्सीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आला होता.

मार्केटमुळे हळदोणे परिसरातील लोकांचे वस्तू खरेदी करण्यासाठी म्हापसा व इतर ठिकाणी जाण्याचे त्रास वाचले होते. मात्र, इमारतीची निगा राखण्याकडे दुर्लक्ष झाल्याने या इमारतीला तडे जाऊ लागले. छताचे काँक्रिट गळून पडू लागले. यामुळे दुकानदार तसेच ग्राहकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

दुकानदार सध्या इमारतीच्या दुरवस्थेबद्दल तक्रार करीत आहेत. पंचायत या मार्केट इमारतीची दुरुस्ती व निगा राखण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार एका महिला मासे विक्रेतीने केली. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी दुरुस्ती केल्याचे नाटक करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासून सोपो कर गोळा करण्यात येत नाही, अशी माहिती तिने दिली.

मार्केट इमारतीबद्दल तक्रार करूनही कोणीही त्याची दखल घेत नाही, असे इतर दोन विक्रेत्यांनी सांगितले. पंचायत भाडे वसूल करते मात्र इमारतीची दुरुस्ती करीत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मार्केट प्रकल्प परिसरात पोलिस आऊट पोस्ट, बसस्टॅण्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी खोली व बाल उद्यान उभारण्यात येणार असल्याचे समजते.

हळदोणेसाठी नवा मार्केट प्रकल्प : सरपंच

हळदोणे गावात नव्या पंचायत प्रकल्पाची गरज असल्याचे हळदोणे पंचायतीचे सरपंच फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. नवा प्रकल्प बांधायचा असेल तर सध्या असलेली इमारत पाडावी लागेल. त्यासाठी सध्या असलेल्या दुकानदारांची व्यवस्था इतर ठिकाणी करावी लागेल. मात्र, पंचायतीकडे अशी जागा नाही.

मार्केट इमारत असुरक्षित घोषित केल्यामुळे दुकानदारांकडून भाडे गोळा केल्याचे पंचायत मंडळाने थांबविल्याची माहिती त्यांंनी दिली. नवा मार्केट प्रकल्प निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर बांधण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.