वाक्याची व्यापकता

इंद्रधनुष्य

Story: डाॅ. अमृता इंदूरकर | 09th March 2019, 10:57 Hrs


--
जरा कल्पना करा की, अापण जी भाषा बोलतो त्यामध्ये वाक्यरचनाच नसती अाणि केवळ शब्दच शब्द असते तर? कठीण अाहे ना! वाक्यरहित भाषेची कल्पना करणे? व्यावहारिक पातळीवर हे शक्यही नाही. कारण भाषिक व्यवहार अाणि संदेशनाच्या दृष्टीने वाक्य फार महत्त्वाची अाहेत. मग वाक्य तयार कसे होतात? विशिष्ट स्वनिमांच्या (भाषेत उपयोजिले जाणारे ध्वनी) मदतीने एकत्रीकरणाने पदीम (शब्द) तयार होतात. या शब्दांकडे वाक्याचा एक घटक म्हणून पाहिले जाते. पण, केवळ अनेक पदिम किंवा शब्द एकत्र येण्याने वाक्य तयार होत नाही. वाक्यातील हे पदिम कोणत्या तरी नियमांनी एकत्र येतात. त्यांचे एक रचनासूत्र असते. त्यांची काही तत्त्वे असतात जी पदिमसमूहातून म्हणजेच वाक्यामधून स्पष्ट होत असतात. भाषेच्या उच्चारणात वाक्य ही सर्वात मोठी रचना मानली जाते. ती अर्थपूर्ण असते. ती लहानही असू शकते. वाक्यांश उपवाक्य, वाक्य, निरनिराळे, व्याकरणिक प्रवर्ग, विविध वाक्यरचना यांचा समावेश वाक्यविचारात होतो.
वाक्याची व्याख्या?
वाक्याची व्याख्या शक्य अाहे का? ढोबळमानाने एक पूर्ण विचार व्यक्त करणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे वाक्य, अशी एक व्याख्या करता येईल. वाक्य म्हणजे लहानातलहान संपूर्ण सार्थ अशी एक संकल्पना म्हणता येईल. हजारो वर्षांपूर्वी भर्तृहरिने देखील या विचाराचे समर्थन केले अाहे.
पदे न वर्णा विद्यन्ते वर्णेष्नवयूवा न च।
वाक्यात् पदानामत्यन्तं प्रविवेको न कश्चन।
(वाक्यपदीय, ब्रह्मकांड)
अर्थात : ज्याप्रमाणे वर्णामध्ये अवयव नसतात त्याचप्रमाणे पदांमध्ये वर्ण किंवा वाक्यामध्ये पद नसतात.
म्हणजेच भाषेमध्ये संपूर्ण वाक्याची सत्ता वास्तविक अाहे. इतर घटक नाही, हे भर्तृहरिना म्हणायचे अाहे. अाधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी वाक्याच्या बाह्य स्वरूपावरून, रूपावरून काही व्याख्या केल्या अाहेत. अाॅटो थेस्पर्सन म्हणतात, ‘वाक्य हे संपूर्ण स्वतंत्र मानवी उच्चारण अाहे. ते स्वतंत्रपणे राहू शकते किंवा तसे राहण्याचे त्याच्याजवळ सामर्थ्य अाहे’. तर ब्लूमफिल्ड म्हणतो, ‘उच्चारणातील दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना (किंवा रूप) म्हणजे वाक्य’. तर हाॅकेट म्हणतो, ‘रचनेमध्ये दुसऱ्या कोणत्याही मोठ्या व्याकरणिक रुपाचा भाग नसलेले व्याकरणिक रुप’.
वरील पाश्चात्य भाषावैज्ञानिकांनी वाक्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या व्याख्या अंतिम नाहीत. कारण वाक्यविचाराचा पसारा अफाट अाहे. वाक्य विचारात शब्दानुसारी वाक्याचा विचार करावा लागतो. शिवाय अर्थदृष्ट्याही विचार करावा लागतो. उदा. ‘मेजावर लेखणी अाहे’, हे मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये The pen is on the table, असे होते. या वाक्यामध्ये पाहिले तर लक्षात येईल की जे मराठीमध्ये पदिम अाहे- ‘मेजावर’ तो इंग्रजीत एक उपवाक्य अाहे. - On the table. या वरून वाक्याचे व रचनेचे केले जाणारे विभाजन हे अभ्यासाच्या सोयीसाठी असते. त्यामुळे भाषविज्ञानात वाक्याची व्याख्या करण्यापेक्षा वाक्याचे विश्लेषण करणे अधिक महत्त्वाचे मानले गेले अाहे. म्हणजेच अदोष वाक्यलक्षणाच्या मागे न लागता काय गोष्टी असल्यास एखादा उच्चारणखंड वाक्य मानता येईल, याचा विचार करणे वाक्यविचारासाठी अधिक उपयुक्त ठरेल.
हा वाक्यविचार तीन गोष्टींच्या मदतीने होऊ शकतो. १) सार्थता २) सामर्थ्य ३) अाकांक्षा.
१) सार्थता : वाक्यामधील शब्द सार्थ हवेत हे प्रमुख.
२) सामर्थ्य : वाक्यामधील निरनिराळ्या शब्दांच्या अर्थामध्ये विरोध असंगती असता कामा नये. उदा. तो चाकूने जेवतो, झाडाला घोड्यांनी पाणी घालतो... अशा पद्धतीची उच्चारणे वाक्य ठरत नाहीत. या वाक्यामध्ये व्याकरणिक योग्यता असली तरी अर्थदृष्ट्या ती सदोष अाहेत. म्हणजे व्याकरणिक अाणि अर्थसंबंधी अशा दोन्ही योग्यता वाक्यात असायला हवी.
३) अाकांक्षा : वाक्यामधील शब्दांना एकमेकांबाबत काहीतरी अाकाक्षा असायला हवी. उदा. देवदत्त गावाला जातो. हे तीन शब्द एकमेकांप्रती अाकांक्षा बाळगणारे अाहेत. देवदत्त उच्चारल्यावर कोण जातो? याचे उत्तर मिळते. गावाला म्हटल्यावर कुठे अाणि जातो म्हटल्यावर परत कोण जातो? यांचेही उत्तर मिळते. अशा वाक्य अंतर्गत अाकांक्षेमधूनच संपूर्ण अर्थप्राप्ती होते.
शब्दक्रमही महत्त्वाचा
परंतु, वाक्यविचाराला केवळ या गोष्टींनी परिपूर्णता येत नाही. वाक्यामध्ये शब्दक्रम देखील तितकाच महत्त्वाचा अाहे. कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द यायला हवा, याचे वाक्यामध्ये फार महत्त्व अाहे. शब्दक्रमाची एक निश्चित पद्धती अाहे. कोणत्याही शब्दाला कोणत्याही क्रमावर ठेवता येत नाही. शिवाय सगळ्या भाषांमधील वाक्यांचा शब्दक्रम हा समान नसतो. मराठीत कर्ता- कर्म- क्रियापद या क्रमानुसार वाक्य तयार होते. उदा. तो पुस्तक वाचत अाहे. या शब्दक्रमानुसार इंग्रजी वाक्य लिहायचे झाले तर He the book reads अशा क्रमाने वाक्य तयार होईल. जे चूक अाहे. कारण इंग्रजीमध्ये कर्ता-क्रिया-कर्म अशा पध्दतीनं शब्दक्रम असतो. म्हणजेच व्याकरणिक शब्दक्रमाची अट पूर्ण करणारा क्रम असायला हवा. याशिवाय अर्थानुसार शब्दक्रमही तेवढाच महत्त्वाचा अाहे. जसे शिकारीने वाघाला मारले यामध्ये शिकारी अाणि वाघ यांचा शब्दक्रम बदलता येणार नाही. नाहीतर वाक्याचा अर्थच बदलून जाईल.
संदेशनाचे माध्यम
सुरुवातीला अापण वाक्य म्हणजे शब्दांचा समूह अशी व्याख्या बघितली होती. पण कोणतीच भाषा इतकी एकसुरी नसते. भाषा ही संदेशनाचे माध्यम असल्यामुळे प्रत्येकवेळी शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य असे निश्चितच नसते. तर कधी-कधी एक साधा शब्द देखील संपूर्ण वाक्याची पूर्तता करतो. यासाठी काही संवाद पाहू.
संवाद १ : मंजु- तु घरी कधी येशील?
सोनाली - उद्या. अाणि तू?
मंजु - परवा
सोनाली - अाणि मोना गेली का?
मंजु - हो
संवाद - २ : अोम - तुझे जेवण झाले का?
सोम- हो झाले तुझे?
अोम - ऊहूं
वरील दोन्ही संवाद वाचल्यावर सहज लक्षात येते की परवा हो, तुझे, ऊहूं हे शब्द म्हणजेच संपूर्ण वाक्य अाहेत. फक्त उच्चारते वेळी त्या शब्दाच्या अवती-भवती येणाऱ्या वाक्यपूर्तता करणाऱ्या शब्दांचा लोप झाला. त्यामुळे वाक्य-विचारामध्ये वाक्याची सार्थता जेवढी महत्त्वाची, तेवढीच अाकलनाप्रती नि: संदिग्धता देखील महत्त्वाची ठरते.
भाषेमध्ये जेव्हा काही अपवादात्मक वाक्ये समोर येतात तेव्हा Sytar ambiguity म्हणजे वाक्य संदिग्धता निर्माण होते. उदा. लठ्ठ सरदार पत्नी, या वाक्यामध्ये लठ्ठ सरदाराची लठ्ठ पत्नी की सरदाराची लठ्ठ पत्नी याचा बोध होत नाही. कच्चे पेरू अाणि अांबे करंडीत ठेवले यामध्ये कच्चे पेरू अाहेत की कच्चे अांबे अाहेत की दोन्ही कच्चे अाहेत, हे कळत नाही.
इंग्रजीतही संदिग्धता
इंग्रजीमध्येही अशी संदिग्धता अाढळते. Old Womens Hostel या वाक्यात वृद्ध बाईचे होस्टेल की बाईचे जुने होस्टेल की बाई अाणि हाेस्टेल दोन्ही जुने, हा बोध होत नाही. प्रत्येक भाषेमध्ये अशी वाक्यसंदिग्धता असते, जी दैनंदिन संदेशनाच्या गरजेतून निर्माण होते. पण, वाक्यातील उतार-चढाव, शब्दाघात, सुरावली यामुळे विशिष्ट वाक्यांचे संदर्भ बोलण्याऱ्यालाही अवगत असतात अाणि एेकणाऱ्यालाही अात्मसात होतात. वाक्यविचारामध्ये महत्त्वाचे ठरणारे हे सर्व घटक लक्षात घेता भाषाविज्ञानात वाक्यविचाराची अधिक संगती लावण्यासाठी वाक्याचा पृष्ठस्तरीय व अंत:स्तरीय पातळीवर अभ्यास केला गेला अाणि काही प्रमाणात वाक्यविचाराच्या अभ्यासाला निश्चित दिशा प्राप्त झाली.
(लेखिका समीक्षक, भाषाशास्त्र अभ्यासक आहेत.)

Top News

परप्रांतातून आलेल्यांकडून राज्याला धोका

मुख्यमंत्री डॉ. सावंत; कोविड रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज Read more

महिला गृहरक्षकांचे रोजंदारी वेतन कापले

लॉकडाऊनमध्ये कामावर गैरहजर राहिल्याचा फटका Read more

अव्वल कारकून भरतीच्या चमत्कारांची चर्चा

उपसभापतींच्या पुत्राचे पदवी प्रमाणपत्र बोगस Read more

‘लॉकडाऊन’च्या चौथ्या टप्प्यात आर्थिक उपक्रमांत आणखी शिथिलता

मुख्यमंत्र्यांची माहिती; सामाजिक अंतराचे प्रामाणिकपणे पालन करण्याचेही आवाहन Read more

दोन विशेष रेल्वेतून ३१८ प्रवासी मडगावात दाखल

दिल्लीतून २८२, तिरुअनंतपुरम येथील ३६ जण गोव्यात Read more