बॅकफूटवर पाकिस्तान

पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर ढकलला गेला आहे. तरी भारतद्वेषावर उभ्या असलेल्या या नापाक राष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि लष्कराच्या उचापती बंद होण्याची शक्यता कमीच आहे.

Story: अग्रलेख | 28th February 2019, 06:00 Hrs

मंगळवारी पहाटे भारताने हवाई हल्ल्यांद्वारे पाकिस्तानची नांगी ठेचली, दहशतवादाच्या आधारावर उभे असलेले हे राष्ट्र त्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाही. जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जावयासमान पाहुणचार आणि संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानला आपल्या आश्रयाखाली फोफावलेल्या या संघटनेची धूळधाण होताना बघावी लागली. एका तडाख्यात बालाकोटमधील जैशचा सर्वांत मोठा आणि सर्व सुविधांनी युक्त तळ नष्ट तर झालाच, त्याचबरोबर साडेतीनशे प्रशिक्षित अतिरेकी, पंचवीसेक कमांडर यांच्यासह मसूद अझरचे दोन भाऊ आणि मेहुणा तेथे ठार झाल्यामुळे पाकचा मोठाच जळफळाट झाला. या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकच्या आधी भारताने असे अचूक नियोजन केले होते की हवाई हल्ल्यांचा प्रतिकारही करणे पाकिस्तानला जमले नाही. गुप्तचरांमार्फत आणि उपग्रह व्यवस्थेच्या मदतीने भारतीय सैन्यदलांनी बालाकोटमधील तळाची इत्यंभूत माहिती मिळविली होती. आयएसआय या सरकारी गुप्तचर संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तान दहशतवादी संघटनांना मदत पुरवित असतो. तसेच पाक लष्कराकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच शस्त्रांची रसद पुरविली जाते. त्यामुळे जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा यासारख्या संघटना पाक भूमीवर फोफावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणाऱ्या मदतीतील मोठा वाटा पाकिस्तान या संघटनांवर खर्च करीत असतो, हे वास्तव भारताने अनेक राष्ट्रांच्या नजरेला आणून दिले. तसेच बालाकोटमधील कारवाई हे पाकिस्तानवर आक्रमण नसून भारताने स्वसंरक्षणासाठी उचललेले पाऊल आहे हे सत्यही हवाई हल्ल्यानंतर लगेचच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी जगभरातील देशांच्या लक्षात आणून दिले. अशा सर्वंकष कारवाईमुळे पाकिस्तानची पूर्ण कोंडी झाली, त्यांना जगाच्या एकाही कोपऱ्यातून समर्थन मिळालेले नाही.
एकीकडे भारताच्या कारवाईचे यश संपूर्ण जगाने डोळे भरून बघितले असताना दुसरीकडे पाकिस्तानचे लष्करी आणि गुप्तचर अपयशही सगळ्यांच्या नजरेत भरले आहे. तसेच ज्या दहशतवाद्यांचे साम्राज्य आपण तयार केले त्या साम्राज्याला आणीबाणीच्या प्रसंगी संरक्षण पुरविण्यास आपण असमर्थ आहोत हे पाकने दाखवून दिले. भारतीय हवाई दलाने बेचिराख केलेला बालाकोटमधील तळ जैश ए महंमद संघटनेचे सर्वात मोठे आणि महत्वाचे केंद्र होते. पुलवामातील नापाक हल्ल्यानंतर भारत बदल्याची कारवाई करेल ही शक्यता गृहित धरून इतर काही ठिकाणच्या दहशतवाद्यांना बालाकोटच्या तळावर आणण्यात आले होते. हा तळ पाकिस्तानच्या हद्दीत आत असल्यमुळे भारत तेथे हल्ला करण्याचे धाडस करणार नाही असा त्यांचा अंदाज होता. उलट भारताने त्याच तळाला प्रमुख लक्ष्य बनवून पाकचे नियोजन किती फोल आहे ते दाखवून दिले. दुसरे म्हणजे एकाच ठिकाणी आपले साडेतीनशे ते चारशे दहशतवादी जमविणे हे धोरणात्मकदृष्ट्या चुकीचे होते, भारतीय गुप्तचरांना याची माहिती मिळताच हे शांततेचे मारेकरी हवाई दलाला आयतेच हाती सापडले. बालाकोटमधील तो तळ घनदाट जंगलात वसलेला असला तरी पंचतारांकित सुविधांनी युक्त असून पुलवामातील हल्ल्याचे यश तेथे साजरे केले जात हाेते. नेमक्या त्या वेळी हवाई दलाच्या बॉम्बची ते शिकार बनले. याचाच अर्थ पाकिस्तानचे माहितीचे आणि नियोजनाचे अपयश दहशतवाद्यांच्या मुळावर आले आणि भारताचे मोठे यश झळाळून निघाले.
जगभरातील एकाही राष्ट्राकडून उघड पाठिंबा मिळाला नसल्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी अडचण झाली अाहे. जैशचा प्रमुख आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टमाईंड मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यासंदर्भातील ठराव फ्रान्सकडून संयुक्त राष्ट्रांत मांडण्यात येणार आहे. रशिया आणि भारतासह चीननेही दहशतवादाचा निषेध केला असल्यामुळे फ्रान्सच्या ठरावाच्या बाजूने राहण्याचे बंधन चीनवर असेल. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत हा ठराव संमत झाला तर मसूद अझरभोवतीचा फास आवळण्यास मदत होईल आणि दहशतवादाच्या विरोधात तोंडदेखली भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला ठोस कारवाई करून दाखवावी लागेल. एवढा तडाखा बसूनही पाकिस्तान सरकारने मग्रुरीची भाषा न सोडता भारतात लढाऊ विमान घुसविण्याचा प्रयत्न बुधवारी सकाळी केला, परंतु भारतीय सेनेने ते विमान पाडून पाकचा तो प्रयत्न फोल ठरविला. आता पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला याचाच अर्थ पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर ढकलला गेला आहे. तरी भारतद्वेषावर उभ्या असलेल्या या नापाक राष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि लष्कराच्या उचापती बंद होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारला आणि लष्कराला सावध राहून पुढील कारवाईचे नियोजन करावे लागेल.      

Related news

सरकारी दिलाशाचीच अपेक्षा

जनसामान्यांना जमेल तेवढा दिलासा देण्यावर सरकारचा भर हवा. लोकांच्या खिशाला हात घालण्याऐवजी खिशात शिल्लक उरेल अशी सरकारी कारभाराची दिशा हवी. Read more

फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रती असंवेदनशीलता नको

आपण ग्रीन झोन घोषित झाल्यामुळे बेसावध तर बनत चाललो नाही ना किंवा हा बेसावधपणा आपल्याला धोका तर देणार नाही ना,असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. Read more

पुन्हा पुतळ्याचे राजकारण

सिक्वेरांच्या पुतळ्याचा विषय तापवत ठेवण्यावर त्यांचा भर असेल. कारण यातूनच फातोर्डा मतदारसंघातील दुरावलेले ख्रिस्ती मतदार पुन्हा जवळ येऊ शकतील असे त्यांना वाटते. Read more

Top News

परप्रांतातून आलेल्यांकडून राज्याला धोका

मुख्यमंत्री डॉ. सावंत; कोविड रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज Read more

महिला गृहरक्षकांचे रोजंदारी वेतन कापले

लॉकडाऊनमध्ये कामावर गैरहजर राहिल्याचा फटका Read more

अव्वल कारकून भरतीच्या चमत्कारांची चर्चा

उपसभापतींच्या पुत्राचे पदवी प्रमाणपत्र बोगस Read more

‘लॉकडाऊन’च्या चौथ्या टप्प्यात आर्थिक उपक्रमांत आणखी शिथिलता

मुख्यमंत्र्यांची माहिती; सामाजिक अंतराचे प्रामाणिकपणे पालन करण्याचेही आवाहन Read more

दोन विशेष रेल्वेतून ३१८ प्रवासी मडगावात दाखल

दिल्लीतून २८२, तिरुअनंतपुरम येथील ३६ जण गोव्यात Read more