शिदोरी प्रेमाची, वात्सल्याची....

कव्हर स्टोरी

Story: राधा भावे |
09th February 2019, 09:27 am
शिदोरी प्रेमाची, वात्सल्याची....


----
‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई....’ हे गाणे लागले की लहानपणी त्यातल्या आर्ततेने जीव कासावीस व्हायचा. त्या कुणाचसं मन, आई जवळ नसल्याच्या दु:खाने पाेळतंय असं वाटून, आपल्याला आई आहे, आपण मायेच्या नात्याच्या आवरणात सुरक्षित आहोत, जे दुसऱ्याला हवंय ते आपल्याजवळ आहे, परंतु ते आपण त्याला देऊ नाही शकतंय... असं काहीबाही मनात येऊन खूप अस्वस्थ वाटायचं. पहिल्या इयत्तेत असताना ‘आई हे परम दैवत आहे,’ हा सुविचार कित्त्यात गिरवताना, त्याचा अर्थ कळत नव्हता. पण, ‘सांग मला रे सांग मला, आई आणिक बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?’ या गाण्यातील आईची महती एेकायला गोड वाटे.
पाठ्यपुस्तकात आईविषयी गौरवोद्गार असलेल्या, सन्मानपूर्वक लिहिलेल्या कथा, कविता, लेख नेहमीच आढळत होते. पण, ही साहित्यातली, गाण्यातली आई आणि प्रत्यक्ष जीवनात अगदी माझ्या आईसह, अवतीभवती दिसणारी, कुणाकुणाची आई फार वेगवेगळ्या आहेत, असं जाणवे. त्यामुळे पुस्तकातल्या आईविषयी जास्त प्रेम वाटे. आईचं आपल्या लेकराविषयीचं प्रेम, माया, त्याग, कष्ट हे पुस्तकातलं वर्णन, तसं तर प्रत्येक आईला लागू पडतं. हे कळायला खूप मोठं व्हावं लागलं वयानं. आणि स्वत: आई झाल्यानंतर तर इतक्या वर्षांत आपल्याला आपली आई कळलीच नाही, हेच आधी समजलं.
खरंच, आई या दोन अक्षरात, किती काय- काय सामावलेलं आहे. आईची माया, आईचं प्रेम, आईचं वात्सल्य, तसं तर शब्दात मांडताच येत नाही. तो फक्त अनुभवण्याचा विषय आहे. आणि जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाला कमी अधिक प्रमाणात आईच्या प्रेमाचा वाटा मिळतच असतो. काहींना ते नीटच कळतं, काहींना त्याची जाणीवच नसते. कारण, आईचं प्रेमही कायम गृहीत धरण्याचीच गोष्ट ठरलीय. आई आपल्या मुलांसाठी जे जे करते, त्याबाबत, ‘त्यात काय एवढं, करायचं तिने आणि तशा तर सगळ्याच आया करतात.’ हा असा अतिशय उपेक्षणीय दृष्टिकोन असतो. सहजतेने मिळालेल्या गोष्टीची, योग्य ती कदर करायचीच नाही अशीच आपली मानसिकता बनून गेलीय.
लहानपणापासून अाईनं अापल्यासाठी जे-जे केलं, ते तिचं कर्तव्यच होतं, अाणि ते मिळणं हा अापला हक्कच अाहे. इतकं साधं-सरळ गणित अापण मांडतो. खरं तर, अाईच्या मनात अापल्या बाळाविषयीची माया, ते अापल्या उदरात अाहे हे कळलेल्या क्षणापासून जन्म घेते. तो मुलगा असेल, का मुलगी तो गोरा की काळा, त्याचा चेहरा, ठेवण, स्वभाव, कशा-कशाची कल्पना नसतानाही, ‘अापलं मूल’ ही जाणीवच तिला अत्यंत मृदू, मायाळू, अास्थेवाईक व जागरुक बनवते. एकाच वेळी अानंद, उल्हास, चिंता, शंका या विविध रंगी भावछटांना ती गोंधळून जाते. परंतु, मी अाई होणार अाहे. अाणि माझं बाळ, ही माझी जबाबदारी अाहे याचं विस्मरण ती स्वत:ला क्षणभर सुद्धा होऊ देत नाही.
‘स्वामी तिन्ही जगाचा, अाईविना भिकारी,’ या वास्तवाचा साक्षात्कार, त्या बाळाला कधी-काळी होईलच याची खात्री नसली तरी,
‘बाळा होऊ कशी उतराई,
तुझ्यामुळे मी झाले अाई’
हा कृतज्ञतेचा सूर अाईच्या मनात सतत नांदत असतो. अापल्यात होणारे शारीरिक, मानसिक बदल हे केवळ अापल्या पोटी वाढत असलेल्या अंकुरामुळेच याचं भान तिच्या मनाला कायम असतं. बाळाच्या अागमनामुळे अापल्या अायुष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या अनेक सुखद शक्यतांची चाहूल तिच्या मनात बाळाविषयी ममत्व अाणि अपार माया निर्माण करते. अाणि हा मायेचा झरा तिच्या हयातभर, तिच्या लेकरांसाठी वाटत झुळझुळत रहातो.
सामाजिक बंधनं अाणि लौकिक दबावामुळे, मूल नकोसं वाटून त्या अर्भकाचा त्याग करण्याच्या अघोरी निर्णयापर्यंत एखादी माता पोचल्याच्या दुर्दैवी घटना काही वेळा दिसतात. परंतु, असा निर्णय घेताना त्या अाईच्या मनाला किती यातना होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. अापल्या नैसर्गिक उर्मी, अापल्या हृदयातील प्रेमाचा पाझर, नाकारून, गाडून असा कठोर निर्णय घेणे, जेवढे अवघड असतं तेवढंच एखाद्या कुमारी मातेला, परितक्त्या स्त्रीला, सर्व जगाशी लढत राहून अापलं मूल वाढवणे हेही संघर्षमय असते. स्त्रीला अाई होताना अशा अनेक परीक्षांना सामोरं जावं लागतं हे खरं, परंतु कुठल्याही परिस्थितीत तिचं अापल्या लेकराविषयीचं प्रेम अाणि वात्सल्य, अोत-पोत, दृढ अाणि अविरत असतं. मग तिचा सामाजिक स्तर, तिची अार्थिक स्थिती, तिची शारीरिक क्षमता, अारोग्य कसं का असेना, अापल्या मुलासाठी दैवत बनण्याचाच प्रयत्न अाणि अट्टाहास असतो तिचा कायम!
क्वचित एखादी अाई, अापल्या मुलांविषयीच्या ममत्वाला काही कारणाने, मूठमाती देताना दिसली तरी सामान्यत: मूल जन्माला अाले की ती एका अदृश्य बंधनात बांधली जाते. बाळाविषयीच्या प्रेमाने गुंगून, गुरफटून जाते. म्हणूनच तर काळजावर दगड ठेवून, कुंतीने केलेला कर्णाचा त्याग, हे एका अाईच्या सोशिकतेचं अन अगतिकतेचं काळाच्या पडद्यावर कायमचं मुद्रित झालेलं उदाहरण अाहे.
अाठवतं, काही वर्षांपूर्वी एक तरी मुलगा हवा, अशी अास मनात ठेवून, तिसऱ्यावेळी नशीब अाजमावून पाहण्यासाठी गरोदर राहिलेली एक स्त्री, यावेळी पण, मुलगी झाली तर तिला दत्तक देईन असा निश्चय करून बसली होती. अोळखीतल्या एका विनाअपत्य जोडप्याला तसा तिने शब्दही दिला होता. अाणि खरोखर तिसरीही मुलगीच झाली. या बाळाच्या मायेत ती इतकी गुरफटली की त्याला दूर करणे तिला अशक्य बनले. तिने मुलीला दत्तक देण्यास असमर्थता दर्शवली. त्या जोडप्यालाही वाईट वाटलं खरं परंतु, अाईपण जिंकलं याचा अानंदही वाटला.
अाईचं प्रेम एकाच ध्येयानं झपाटलेलं असतं. अापल्या मुलांचं कल्याण! अापल्या लेकराचं भरण-पोषण योग्य प्रकारे व्हावं, त्याला जे-जे मिळावं ते मिळवून देण्यासाठी कितीही कष्ट उपसायची अाईची तयारी असते. मुलाचं अाजारपण, दुखलं-खुपलं बघताना हळवी होणारी अाई, दिवस-रात्र उश्या -पायथ्याशी बसून सेवा करणारी अाई, अापल्या लेकराच्या भल्यासाठी प्रसंगी त्याला कठोर शिक्षा करण्यास मागे-पुढे पहात नाही. अापल्या लेकराचं हीत हेच तिचं लक्ष असतं. तिचं प्रेम तिच्या मुलाभोवती कवच बनून उभं असतं. बाहेरच्या जगापासून त्याला कोणतीही इजा पोचू नये, यासाठी सावध-सतर्क असते. अापल्या मुलाच्या बाजूने लढताना त्याची अाई चंडिकेचं रुप धारण करते तर त्याचे गुणगान गाताना, त्याचं कौतुक करताना तिच्या शब्दांना वसंतातला बहर येतो.
एक खरं, पूर्ण वेळ घर संसार सांभाळणारी, गृहिणी असलेली अाई, अापलं अाईपण अधिक चांगल्या रितीने निभावू शकते. ती अापल्या अाईपणाला पर्यायाने मुलांविषयीच्या तिच्या प्रेमाला योग्य न्याय देणारी सक्षम माता ठरते. या उलट नोकरी-व्यवसाय करणारी स्त्री, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीत इतकी व्यग्र रहाते की मुलांना पुरेसा वेळ देऊ न शकल्याच्या भावनेने अपराधी बनते. तिचं अाईपण, तिचं वात्सल्य, तिचं प्रेम बरचसं दबलेलं, कोंडलेलं राहतं. मुलांना वेळ देता येत नाही, त्यांचा सहवास लाभत नाही, त्यांच्यावर मनाजोगे संस्कार करता येत नाहीत, ही जाणीव कित्येक नोकरदार अायांच्या मनाला कुरतडत असते... अाणि अपराधीपणाने झाकोळलेलं मन, त्या मनात गुदमरणारं अापल्या अपत्याविषयीचं प्रेम अतिकाळजीचं रुप घेतं, अतिसंरक्षक बनतं. अाताच्या काळात, एखादं -दुसरंच मूल असणाऱ्या स्त्रीचं अाईपण त्या अपत्याला अापल्या जगण्याचा केंद्रबिंदू बनवतं.
तेच तिचं विश्व बनतं, दया क्षमा, करुणा, जिव्हाळा, आत्मियता, लोभ अादी अनेक छटांनी युक्त असलेलं अाईचं प्रेम, काळजीपूर्वक जोपासून मोठं केलेलं तिचं बाळ जेव्हा पंख फुटून दूर उडून जाऊ पाहतं तेव्हा जास्त समंजस बनतं, कणखर बनतं. अाईच्या विशुद्ध, निरपेक्ष प्रेमाची जाण असलेल्या, भाग्यवान लेकरालाच कळतं, अाईचं प्रेम ही जन्मभराची शिदोरी अाहे... न सरणारी...
(लेखिका वस्तुसंग्रहालयाच्या प्रमुख आहेत.)