पोटनिवडणुकीचा पेच

सरकार बळकट करण्यासाठी म्हणून काँग्रेसमधून दोन आमदार फोडून भाजपमध्ये आणण्याचे राजकारण खेळले गेले. भाजपच्या दुर्दैवाने हे साहसी राजकारण आता पक्षाच्या अंगलट येऊ पाहात आहे.

Story: अग्रलेख | 08th February 2019, 05:45 Hrs

काँग्रेसचे दोन आमदार फोडून आपल्याकडे आणण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षात गेल्या वर्षी झाले. दोन आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करावा आणि पक्ष तसेच सरकार बळकट करण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडून यावे असे डावपेच ठरले. तसे झाल्यास काँग्रेसच्या आमदारांची संख्या दोनने घटून सोळावरून चौदावर येईल आणि भाजपच्या आमदारांची संख्या चौदावरून वाढून सोळावर जाईल. अर्थात विधानसभेत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष बनेल. शिवाय मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष या सरकारातील घटकांचे महत्व काही प्रमाणात कमी करता येईल असा भाजपच्या बाजूने विचार होता. नियोजनानुसार काँग्रेसचे शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच पोटनिवडणूक जाहीर होऊन दोघांनीही भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येणे अपेक्षित होते. परंतु गेल्या काही वर्षांत गोव्यात एकही प्रश्न सरळपणे सुटत नाही, त्यानुसार पोटनिवडणुकीचा विषयही गेल्या साडेतीन-चार महिन्यांत त्रांगडे होऊन बसला आहे. शिरोडकर आणि सोपटे यांच्या पक्षांतरानंतर भाजपमधूनच त्यांच्या या कृतीला जोरदार विरोध होऊ लागला. मांद्रेत लक्ष्मीकांत पार्सेकर तर शिरोड्यात महादेव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आघाडी उघडत अनुक्रमे सोपटे आणि शिरोडकरांच्या उमेदवारीला विरोध केला. खुद्द पार्सेकर आणि महादेव यांनीही माघार घेण्यास आपण तयार नसल्याचे दर्शविले. कारण येथे माघार म्हणजे राजकीय कारकिर्दीचा अस्त हे ठरून गेले आहे. बहुधा या पेचामुळे दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीबाबत काही हालचाल अद्याप दृष्टीस पडलेली नाही.
एकीकडे भाजपमधील हा गुंता वाढत चालला असताना दुसरीकडे सरकारातील घटक पक्षांनीही भाजपसमोरील अडचणी वाढविण्यावर भर दिला आहे. काँग्रेसच्या आमदारांचे राजीनामे येताच मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोड्यातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करून प्रचाराचा नारळही फोडला. मागील निवडणुकीत प्रियोळमधून पराभूत झाल्यामुळे त्यांना आमदारकीसाठी पुन्हा नशीब आजमावून बघायचे आहे. मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलो तरी आपण पक्षाच्या धोरणानुसार पर्रीकर सरकारलाच पाठिंबा देणार असल्यामुळे सरकारसमोर धोका नाही असा दीपक यांचा दावा आहे. परंतु त्यामुळे भाजपचे उमेदवार बनणार असलेल्या शिरोडकरांसमोर तसेच पर्यायाने भाजपसमोर राजकीय संकट उभे ठाकू शकते. या परिस्थितीत दीपक यांना माघार घेण्यास लावण्याचे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. अलिकडच्या काळात भाजपचे राजकीय मसिहा बनू पाहणाऱ्या विजय सरदेसाई यांनी मगो पक्षाचे डावपेच बघून आपल्या परीने वेगळा बेत आखला आहे. दीपक शिरोड्यातून पोटनिवडणुकीत उतरले तर मगो पक्षाच्या दोन आमदारांना फोडून सुदिन ढवळीकरांना एकटे पाडायचे, पर्यायाने ढवळीकरांना सरकारातून बाहेर काढून आपले स्थान बळकट करायचे असा सरदेसाईंचा बेत! याची अप्रत्यक्ष वाच्यता ते हल्ली करीत आहेत. मगोने पोटनिवडणूक लढविली तर सरकार कोसळेल आणि आपला हा बेत सरकार वाचविण्यासाठी आहे अशी बाजू ते मांडतात. प्रत्यक्षात दीपक शिराेड्यातून निवडून आले तर मगो पक्षाचे चार आमदार हाेऊन गोवा फॉरवर्ड मागे पडेल आणि सरकारातील मगोचे महत्व वाढेल ही भीती त्यांच्या मनात असावी.
सरकार बळकट करण्यासाठी म्हणून काँग्रेसमधून दोन आमदार फोडून भाजपमध्ये आणण्याचे राजकारण खेळले गेले. भाजपच्या दुर्दैवाने हे साहसी राजकारण आता पक्षाच्या अंगलट येऊ पाहात आहे. शिरोडकर आणि सोपटे यांच्या राजीनाम्यामुळे आवश्यक बनलेल्या पोटविडणुकीचे मोठे राजकारण मगो आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात सुरू झाल्यामुळे सरकारच्या घटक पक्षांतील धुसफूस समोर आली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी पडल्यापासून सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई यांच्यात मंत्रिमंडळातील ज्येष्ठतेवरून चुरस सुरू झाली. पोटनिवडणुकीच्या विषयावरून ही चुरस अधिकच तीव्र बनली आहे. दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दोघांपैकी एकाही नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला सरकारातून बाहेर पडायचे नाही, परंतु सरकारात आपले वर्चस्व राखायचे आहे. सरकार आणि पक्ष बळकट बनविण्यासाठी शिरोडकर आणि साेपटे यांना सत्तेचे आमीष दाखवून आपल्याकडे ओढले खरे. आता एक तर त्यांना निवडून आणण्याचे आव्हान आणि दुसरीकडे सरकारातील घटक पक्षांवर नियंत्रण ठेवण्याचे कठीण काम अशा पेचात भाजप सापडला आहे. त्यावर उपाय म्हणून पोटनिवडणुका लोकसभेबरोबरच घेण्याचा मार्ग भाजपला सुरक्षित वाटू शकेल.      

Related news

सरकारी दिलाशाचीच अपेक्षा

जनसामान्यांना जमेल तेवढा दिलासा देण्यावर सरकारचा भर हवा. लोकांच्या खिशाला हात घालण्याऐवजी खिशात शिल्लक उरेल अशी सरकारी कारभाराची दिशा हवी. Read more

फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रती असंवेदनशीलता नको

आपण ग्रीन झोन घोषित झाल्यामुळे बेसावध तर बनत चाललो नाही ना किंवा हा बेसावधपणा आपल्याला धोका तर देणार नाही ना,असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. Read more

पुन्हा पुतळ्याचे राजकारण

सिक्वेरांच्या पुतळ्याचा विषय तापवत ठेवण्यावर त्यांचा भर असेल. कारण यातूनच फातोर्डा मतदारसंघातील दुरावलेले ख्रिस्ती मतदार पुन्हा जवळ येऊ शकतील असे त्यांना वाटते. Read more

Top News

परप्रांतातून आलेल्यांकडून राज्याला धोका

मुख्यमंत्री डॉ. सावंत; कोविड रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज Read more

महिला गृहरक्षकांचे रोजंदारी वेतन कापले

लॉकडाऊनमध्ये कामावर गैरहजर राहिल्याचा फटका Read more

अव्वल कारकून भरतीच्या चमत्कारांची चर्चा

उपसभापतींच्या पुत्राचे पदवी प्रमाणपत्र बोगस Read more

‘लॉकडाऊन’च्या चौथ्या टप्प्यात आर्थिक उपक्रमांत आणखी शिथिलता

मुख्यमंत्र्यांची माहिती; सामाजिक अंतराचे प्रामाणिकपणे पालन करण्याचेही आवाहन Read more

दोन विशेष रेल्वेतून ३१८ प्रवासी मडगावात दाखल

दिल्लीतून २८२, तिरुअनंतपुरम येथील ३६ जण गोव्यात Read more