जपानचा सामना कतारशी


31st January 2019, 03:53 pm
जपानचा सामना कतारशी

दुबई :एएफसी आशिया चषकाचा अंतिम सामना जपान विरुद्ध कतार यांच्यात शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. जपानने इराणचा ३-० गोलने तर कतारने यजमान सौदी अरबचा ४-० गोलने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
जपानला या चषकाचा प्रबळ दावेदार समजले जाते मात्र प्रथमच अंतिम फेरीत दाखल झालेला कतार आपल्या खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या जोरावर या किताबावर आपला दावा ठोकून आहे. विक्रमी चार वेळा आशियाई चषक जिंकणाऱ्या जपानने उपांत्य सामन्यात किताबाच आणखी एक प्रबळ दावेदार इराणचा ३-०ने पराभव केला होता. मागच्या वर्षी विश्वचषकानंतर हाजिमे मारियासू प्रशिक्षक बनल्यानंतर जपानचा संघ मागच्या ११ सामन्यांपासून अपराजित राहिलेला आहे.
जपानला अजून आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला नाही तर कतारच्या बचावफळीने या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे व त्यांच्याविरुद्ध सहा सामन्यांमध्ये एकाही गोलाची नोंद झाली नाही.
कतारने आतापर्यंत जपानसारख्या मजबूत संघाचा सामना केला नाही. कतारच्या संघाने उपांत्य सामन्यात चांगली कामगिरी करताना स्थानिक संघाला पराभूत केले.
उपांत्य सामन्यात सौदीला पराभूत केल्यानंतर कतारचे खेळाडू आनंद साजरा करत असताना प्रेक्षकांनी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. या​शिवाय कतारने गोल केल्यानंतर प्रत्येकवेळी त्यांच्यावर बाटल्या फेकण्यात येत होत्या व मिडफिल्डर सालेम अल हाजरीलाही यामुळे दुखापत झाली. सौदी व कतार यांच्यातील शत्रुत्व हे फुटबॉलच्या मैदानावरही पाहण्यास मिळत आहे.