मांडवी पुलाची पर्रीकरांकडून पाहणी

जुवारी पुलाच्या कामालाही भेट; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का, विरोधक चकित


17th December 2018, 06:28 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : आजारपणामुळे विश्रांती घेणे भाग पडलेले परंतु तरीही घरूनच सरकारी कामकाजाची सूत्रे हाताळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रविवारी अचानक घराबाहेर पडले. तिसऱ्या मांडवी पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते चक्क पुलावर पोहोचले. एवढेच नाही तर आपल्या खासगी वाहनातून जुवारी पुलाच्या कामाची पाहणी करून त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांना आवश्यक सूचनाही केल्या. पर्रीकरांच्या या आकस्मिक भेटीच्या वार्तेने राज्यभरातील कार्यकर्ते, हितचिंतक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कुतूहल तर निर्माण झालेच, परंतु त्यांचे फोटो पाहून अनेकजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मांडवीवरील तिसरा पूल हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या खास संकल्पनेतून तयार होत आहे. या पुलाच्या कामाकडे त्यांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे. पुढील जानेवारी महिन्यात या पुलाचे उद्घाटन करण्याची सरकारने सिद्धता केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्घाटनासाठी येण्याची तयारीही दर्शवली आहे. दरम्यान, रविवारी अचानक मांडवी पुलाची पाहणी करण्याची जबर इच्छा व्यक्त करून मुख्यमंत्री पर्रीकर घराबाहेर पडले. संध्याकाळी ४ वाजता ते खासगी वाहनातून तिथे जाण्यास निघाले. यावेळी त्यांचे पुत्र उत्पल, डॉ. जगन्नाथ कोलवाळकर, डॉ. केदार पडते, मुख्यमंत्र्यांचे निजी सचिव रूपेश कामत तसेच पीएसओ हजर होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे नातू देखील यावेळी हजर होते. त्यांच्या भेटीची कल्पना गोवा पायाभूत विकास महामंडळ आणि एल अॅण्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ते तत्काळ सज्ज झाले. 

मुख्यमंत्री ठरल्याप्रमाणे ताळगावातून पर्वरी येथे पोहोचले आणि तिथून त्यांचे वाहन थेट पुलावर चढविण्यात आले. पुलावर तीन ठिकाणी पर्रीकर उतरले आणि त्यांनी कामाची पाहणी करून जीएसआयडीसी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. आजारपणामुळे ते अशक्त बनले असले तरी त्यांची बुद्धी अजूनही चौकस आहे. तसेच पुलावर पोहोचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह संचारल्याचे छायाचित्रांवरून पाहायला मिळते. मुख्यमंत्री पुलावर उभे राहून पाहणी करीत असल्याचे खालील पुलावरून लोकांना दिसल्यानंतर मोबाईलवरून त्यांचे फोटो घेण्यासाठी सगळेच सरसावले. अनेकांनी बसगाड्यांतून त्यांचे फोटो काढले आणि नंतर ते सोशल मीडियावरून व्हायरल केले. पर्वरी येथून पुलावर प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या बाजूला मेरशी जंक्शन येथून ते खाली उतरले. या एका बाजूचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

चलो जुवारी...

मेरशी येथे मांडवी पुलावरून खाली उतरल्यानंतर घरी जाण्याचे ठरले होते, परंतु तिथून गाडी जुवारी पुलाकडे न्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी घरी जाऊ, असे सांगूनही त्यांनी वाहन कुठ्ठाळीच्या दिशेने नेण्यास भाग पडले. वाटेत वाहतुकीची रहदारी खूप होती. तसेच तेथील अधिकाऱ्यांनाही कल्पना देण्यात आली नव्हती. ते वाटेत उतरले नाहीत, परंतु वाहनातून मात्र त्यांनी वेर्णापर्यंत जाऊन एकूणच कामाची पाहणी केली. त्यानंतर फोनवरून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. या एकूणच कामाच्या गतीबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हे दोन्ही पूल निश्चित वेळेतच पूर्ण व्हायलाच हवेत, असेही त्यांनी सुचवले आहे. या पाहणीनंतर ते बरेच समाधानी वाटले आणि त्यानंतर त्यांनी घरी जाण्याची तयारी दर्शवली.

पर्रीकरांच्या दर्शनाने कार्यकर्ते, हितचिंतक उत्साहित

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याचा तपशील हवा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून हा निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे दर्शन घडत नसल्याने त्यांनी कार्यालयात यावे, अशी मागणी करण्यासाठी विरोधी काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलन सुरू आहे. ‘आयज येतलो, फाल्या येतलो...’ हे कोकणी गीत लावून काँग्रेस आंदोलक मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मांडवी आणि जुवारी पुलासाठीची भेट सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का ठरली. ते आजारी असले आणि शारीरिकदृष्ट्या जरी कमजोर बनले तरी, त्यांची बुद्धी अजूनही सतेज आहे. ते राज्याचे प्रशासन तथा विकासकामांचा आढावा घेतात, हेच त्यांनी आपल्या या भेटीतून सिद्ध केले. या भेटीचे फोटो व्हायरल होताच त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक उत्साहित झाले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मांडवी पुलावरील पाहणीची छायाचित्रे पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. या छायाचित्रात ते प्रत्यक्ष अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. त्यांच्या नाकात ‘पाईप’ आहे. ते अशक्त बनले आहेत आणि त्यांना आधार घ्यावा लागतो. परंतु त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर मात्र काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह भरभरून वाहत असल्याचे दिसून आले. या भेटीनंतर सोशल मीडियावरून भाजपचे कार्यकर्ते, हितचिंतक तसेच सर्वसामान्य जनतेमधूनही त्यांच्या या चिकाटीचे कौतुक सुरू होते.