कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन


10th February 2018, 07:18 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : कार्निव्हल ही गोव्याची संस्कृती नाही किंवा कोणत्याही जाती- धर्माचा हा सण नाही. मात्र, पर्यटनासाठी वरदान ठरत असल्याने परंपरेनुसार गोव्यामध्ये कार्निव्हल साजरा करण्यात येतो, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले.                  

पर्यटन खात्याने पणजी कांपाल येथील बांदोडकर मैदानावर आयोजित केलेल्या चार दिवसीय अन्न व संस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री आजगावकर बोलत होते. यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल, महापौर सुरेंद्र फुर्तादो व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.                  

कार्निव्हल महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान कार्निव्हलची धूम असेल. यावेळी खा, प्या आणि मजा करा, असे आवाहन पर्यटनमंत्र्यांनी पर्यटकांना केले. मात्र, गोमंतकीय संस्कृतीवर कोणताही अन्याय खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला आहे. गोव्याच्या कार्निव्हलचा जगात नावलौकिक असून त्यासाठीच अनेक पर्यटक गोव्यात येतात. त्यांची सुरक्षा राखणे आपली जबाबदारी असल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले.                   

काही मंत्री किंवा अन्य कोणी काय बोलतात, यावर आपण लक्ष देत नाही. गोमंतकीयांना काय हवे व गोव्यासाठी काय चांगले, याचा विचार करून प्रत्येक निर्णय घेतो, असे आजगावकर यांनी सांगितले.

किनारी स्वच्छता निविदा नव्याने काढणार

राज्यातील किनारे स्वच्छ ठेवणे ही पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे किनारी स्वच्छतेसाठी नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे मंत्री आजगावकर यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. किनारी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असेही आजगावकर यांनी स्पष्ट केले. 

हुल्लडबाजी नको  

गोव्यातील संस्कृती, परंपरा जपूनच पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटावा. पर्यटकांनी गोव्यात येऊन हुल्लडबाजी केल्यास किंवा अमली पदार्थ सेवन तसेच व्यवसाय केल्यास खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे  बाबू आजगावकर यांनी सांगितले.