काजीभाटमध्ये पाईपलाईनलाही विरोध

स्थानिकांकडून मशीनसमोरच ठाण; सुदिन ढवळीकरांविरोधात घोषणा


19th January 2018, 03:04 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता 

फोंडा : उंडीर-बांदोडा येथील स्थानिकांनी मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध केल्यानंतर गुरुवारी काजीभाट येथे पाईपलाईन टाकण्यासाठीही तीव्र विरोध दर्शविला. मलनिस्सारण प्रकल्प आपल्या परिसरात येऊ देणार नसल्याची भूमिका घेत स्थानिकांनी खोदकाम करण्यासाठी आणलेल्या मशीनसमोर ठाण मांडले. त्यामुळे संबंधित खात्याच्या कामगारांना काम न करताच तेथून परतावे लागले.

मलनिस्सारण महामंडळाने गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान काजीभाट परिसरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्याचे ठरविले होते. त्यानुसार महामंडळाचे कर्मचारीही यंत्र सामुग्रीसह तेथे उपस्थित होते. मात्र या कामाची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ काजीभाट येथे धाव घेत खोदकामासाठी आणलेल्या मशीनसमोर ठाण मांडले आणि खोदकामाला ठाम विरोध दर्शविला. उपस्थित स्थानिकांनी सरकारी अधिकारी, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता दिलीप ढवळीकर यांच्या उपस्थितीतच सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित उपजिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, संयुक्त मामलेदार अभीर हेदे, पोलिस उपअधीक्षक महेश गावकर आणि पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर यांनी संतप्त स्थानिकांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी स्थानिकांच्या मागणीनुसार २२ जानेवारीपर्यंत काम सुरू न करण्याचे आश्वासन देत महामंडळाचे अधिकारी तेथून निघून गेले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड, स्वाती केरकरही यावेळी उपस्थित होते.

शा​िब्दक वादामुळे पोलिसही दाखल

मलनिस्सारण विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याबाबतची कागदपत्रे स्थानिकांना दाखवत काम अडविण्याचा अधिकार कुणालाच नसल्याचे सांगितले. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे येथे खोदकाम करणे न्यायालयाचा अवमान ठरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी येथे काम करण्यास काहीच हरकत नसल्याचा मुद्दा मांडला. अधिकारी व स्थानिकांत शा​िब्दक वाद वाढत गेल्याने या परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

स्थानिकांनी प्रस्तावित प्रकल्पाला पंचायत संचालनालयात आव्हान दिले असून, त्यावर २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यात आम्ही हे काम बंद ठेवण्याची मागणी करणार आहोत. 

— गुरुदास नाईक, आंदोलक