अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री घेणार प्रत्येक मंत्र्याची स्वतंत्र बैठक

खातेनिहाय आराखडे तयार करण्याचे निर्देश


19th January 2018, 04:05 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : यंदाचा अर्थसंकल्प अनोख्या पद्धतीने तयार करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कार्यरत झाले आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तसेच फेब्रुवारीच्या प्रारंभी प्रत्येक मंत्र्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन ते त्यांच्याशी खातेनिहाय्य चर्चा करणार आहेत. यासाठी सर्व मंत्र्यांना आपापल्या खात्यासंबंधीचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी जारी केले आहेत.

राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्र पाठवून स्वतंत्र बैठक बोलाविणार असल्याचे सांगितले आहे. मागील अर्थसंकल्पातील खात्यांसाठीची आर्थिक तरतूद आणि निधीच्या विनियोगासंबंधीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश मंत्र्यांना देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त खाते सचिव, खाते प्रमुख यांनी लेखा अधिकाऱ्यांसोबत बसून सखोल आराखडा तयार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचविले आहे. या आराखड्यात खात्याअंतर्गत योजनांची माहिती, योजनांची आकडेवारी, योजनांवरील खर्च तसेच योजनांची कार्यवाही या सर्व गोष्टींची सखोल माहिती अपेक्षित आहे. खातेनिहाय योजना आखताना सर्वच घटकांपर्यंत ही मदत पोहोचेल का याची तसेच एखादी योजना कार्यान्वित होण्यात काही अडचण निर्माण झाल्यास त्याबाबतची माहितीही देण्याचे निर्देश त्यांनी पत्राद्वारे मंत्र्यांना दिले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक खात्याचा बारकाईने विचार करून ही खाती जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरावीत, अशी योजना आखण्यात आली असून, मुख्यमंत्री त्यादृष्टीने प्रयत्नशील असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे...

मंत्र्यांकडून जुन्या तसेच कालबाह्य बनलेल्या योजनांची वेगळी माहिती अपेक्षित आहे.

वेगवेगळ्या योजना एकत्र करून एकात्मिक योजना तयार करता येईल का, याची शक्यता प्रत्येकाने पडताळून पाहावी. 

मंत्र्यांनी २५ जानेवारीपर्यंत आपल्याकडील प्रत्येक खात्याचा आराखडा वित्त खात्याकडे सुपूर्द करावा. 

आराखडे वेळेत पोहोचल्यास त्याबाबत चर्चा करणे सोयीचे ठरेल.

बैठकीचा कार्यक्रम आराखडे पोहोचल्यानंतर जाहीर केला जाईल.