ख्रिस्ती मतदारांसाठी जनमत कौलाचे भांडवल

मिकी पाशेको यांचा आरोप : आगामी निवडणुकीत धडा शिकवणार


19th January 2018, 03:58 am
ख्रिस्ती मतदारांसाठी जनमत कौलाचे भांडवल


प्रतिनिधी | गोवन वार्ता

मडगाव  : राज्य सरकाराच्या विधी मंडळतील नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना जनमत कौलाचे काहीही सोयरसुतक नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी आरोप- प्रत्यारोप करणाऱ्या भाजपशी हात मिळवणी करून सत्ता उपभोगल्यामुळे नाराज बनलेल्या व दुरावलेल्या ख्रिस्ती मतदारांना पुन्हा जवळ आणण्यासाठी जनमत कौलाचे भांडवल करीत आहेत, असा आरोप नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केला.                   

राज्याच्या विधीमंडळात राहून नगर नियोजन मंत्री सरदेसाई एका बाजूने राज्याची लुटमार करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूने जनमत कौलाचा कार्यक्रम साजरा करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करीत असताना दिसत आहे. जनमत कौल हा त्यांचा जनतेची दिशाभूल करण्यासाठी केवळ दिखावा आहे.                   

नगर नियोजन मंत्री देसाई यांना जनमत कौलाचे महत्त्व पटले असते अथवा  जॅक सिक्वेरा यांची आपुलकी असली असती, तर कोलवा वाहतूक बेट ते रवींद्र भवनपर्यंतच्या परिसर चौकाला जॅक सिक्वेरा यांचे नाव कशाला द्यावे? त्यांच्या घरासमोर उभारण्यात येत असलेल्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळला जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्यासाठी त्यांनी झटायला पाहिजे, असे  मिकी पाशेको यांनी सांगितले.             

 विधानसभेच्या संकुलात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी सध्या सरकारच्या विधीमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर हे कडाडून विरोध करीत आहेत. जनमत कौल व जॅक सिक्वेरा यांच्याबद्दल सरदेसाई यांना खरोखरच आपुलकी असेल, तर ते  मंत्री ढवळीकर यांना सरकारमधून वगळण्यासाठी  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दबाव आणावे, असे आव्हान मंत्री सरदेसाई यांना पाशेको यांनी दिले. 

मिकी पाशेको यांचा आरोप : आगामी निवडणुकीत धडा शिकवणार