बायणात ३२ बांधकामांवर हातोडा

सीआरझेड अंतर्गत येत असल्याने कारवाई


19th January 2018, 03:57 am
बायणात ३२ बांधकामांवर हातोडा


प्रतिनिधी। गोवन वार्ता             

वास्को : येथील बायणा समुद्र किनाऱ्यावरील ३२ बांधकामे गुरुवारी पाडण्यात आली. ही कारवाई दुपारपर्यंत पूर्ण केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही कारवाई शांततेत पार पडली.             

यापूर्वीही बायणा किनाऱ्यावरील सुमारे तीनशेच्या आसपास बांधकामे हटविण्यात आली होती. बायणा किनाऱ्यावर १२१ बांधकामे उरली होती. त्यातील ३८ बांधकामे गुरुवारी पाडण्यात येणार होती. मात्र सहा जणांनी आपल्या बांधकाम पाडण्याच्या आदेशावर स्थगिती आणल्याने त्यावर कारवाई झाली नाही​. ही बांधकामे सीआरझेड अंतर्गत येत असल्याने ती पाडण्यासंबंधी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र ३८ जण वगळता इतरांनी या नोटिशीविरुध्द न्यायालयात याचिका दाखल केल्याने त्या बांधकामांसंबंधीचा निर्णय न्यायालयाच्या निकालानंतरच होणार 

आहे.                  

पंधरा दिवसांपूर्वी मुरगाव मामलेदार कार्यालयातून ३८ बांधकामांना नोटिशी जारी करण्यात आल्या होत्या. ही बांधकामेहटविण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र सहा जणांनी स्थगिती आणल्याने ती पाडली नाही. गुरुवारी सकाळी तेथील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी मुरगावचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर उपस्थित होते. बांधकामे पाडण्यासाठी पाच जेसीबींचा वापर करण्यात आला. सदर बांधकामे सलग नसल्याने बांधकामे पाडताना जेसीबी चालकांना मोठी कसरत करावी लागली. एखादे बांधकाम पाडताना स्थगिती असलेल्या बांधकामाला धक्का लागणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावी लागली.             या ठिकाणी अग्निशामक दलाचा बंब तैनात ठेवण्यात आला

 होता.

कडक पोलिस बंदोबस्त            

 रहिवाशांकडून कोणताही प्रतिकार होऊ नये, तसेच शांतता बिघडू नये, यासाठी तेथे सुमारे ३०० पोलिस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले होते. यासाठी दक्षिण गोव्यातील काही पोलिस स्थानकातील पोलिसांना तेथे बंदोबस्तासाठी आणले  होते. त्यांच्या मदतीला राखीव दलातील पोलिसही तैनात करण्यात आले होते. वास्कोच्या पोलिस उपअधीक्षक सुनीता सावंत, वास्कोचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ, वेर्णाचे निरीक्षक निनाद देऊलकर, मुरगावचे निरीक्षक शैलेश नार्वेकर, निरीक्षक सागर एकोस्कर, रवी देसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, कपिल नायक, सुदेश नाईक, नवलेश देसाई हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

राजकीय व्यक्तींची पाठ

बांधकामे पाडल्यावर तेथील टाकाऊ वस्तूंची अन्यत्र वाहतूक करण्यासाठी ट्रकांची सोय करण्यात आली होती. बांधकामे पाडताना गोंयच्या रापणकारांची एकवोटचे ओलंसियो सिमोईस तसेच इतर तेथे उपस्थित होते. मात्र राजकीय व्यक्तींनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. यापूर्वीच्या कारवाईच्या वेळी राजकीय व्यक्तींकडून तेथील रहिवाशांना सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.