महिला काँग्रेसतर्फे नारळ विक्री

दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण : सरकारकडून दुर्लक्ष


19th January 2018, 03:56 am
महिला काँग्रेसतर्फे नारळ विक्री



प्रतिनिधी : गोवन वार्ता                  

पणजी : नारळाच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत अाहे. यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे सरकारने यावर तत्काळ उपायोजना करावी. स्थानिक बागायतींमधील नारळ कशाप्रकारे माफक दरात उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, हे दाखवून देण्यासाठी गुरुवारी महिला काँग्रेसतर्फे पणजी मार्केटमध्ये नारळ विक्री करण्यात 

आली.

महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखालील सावित्री कवळेकर, जेसिका मिनेझिस, प्रतिभा बोरकर, सोनिया मांद्रेकर, प्रिया राठोड, डायना ब्रागंझा, रजनी शिरोडकर, दिया शेटकर, सुभाष केरकर, हिनेश कुबल आदींसह अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुमारे ३०० नारळांची १० आणि १५ रुपये दराने विक्री करण्यात आली होती. त्यांची त्वरित विक्री झाली.                   

नारळ हा नित्य जीवनाचा भाग आहे. तरीही सरकार याकडे दुलर्क्ष करत आहे. वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य गोमंतकीयांना तो विकत घेणे अवाक्याबाहेर जात आहे. नारळ माफियांसाठी परदेशातून नारळ आणण्याचा सरकारचा डाव दिसतोय. नारळ अनुपलब्ध होण्यामागे पाडेली मिळत नाही, असे सरकार सांगते. जर ते नसतील तर ज्यांना इच्छा आहे, त्यांना प्रशिक्षण द्यावे आणि या समस्येवर तोडगा काढावा. असे आवाहन कुतिन्हो यांनी केले.   

नारळाच्या वाढत्या दरामागे माफियांचा हात : कुतिन्हो

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

शिवोली  : नारळाच्या वाढत्या दारामागे नारळ माफिया असून दहा रुपयांना नारळ विकत घेऊन ग्राहकांना चाळीस ते पन्नास रुपयांना  विकला जात आहे. सरकारने नारळासाठी अनुदान देऊन नारळ स्वस्त करण्याची मागणी महिला काँग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे.  

नारळाच्या दर वाढत असल्याचा निषेध करत काँग्रेसकडून स्वस्त दरात नारळांची विक्री करण्यात आली. यावेळी कुतिन्हो यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, नारळ हा गोमंतकीयांच्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे. आज नारळाचे दर भरमसाठ वाढलेले आहेत. सरकार नारळ श्रीलंकेतून आणण्याचा विचार करीत आहे. माहिती हक्क कार्यकर्ता राजन घाटे यांनीही सरकारवर टीका केली.

भाजप महिला मोर्चा गप्प का?

काँग्रेस सत्तेवर असताना टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली होती. त्यावेळी भाजप महिला मोर्चाच्या सदस्यांनी किंमत कमी करावी म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. आज ही समस्या भेडसावत असताना त्या का गप्प आहेत?