दोनापावल अपघातात दोघांचा मृत्यू


19th January 2018, 03:52 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : दोनापावला येथे गुरूवारी पहाटे दुचाकीने सूचना फलकाला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला. अपघातावेळी दुचाकीवर तिघे जण स्वार होते. दुचाकीच्या मागे बसलेल्या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. पणजी पोलिसांनी दुचाकीस्वार जेसबन पावलो सिक्वेरा याच्या विरोधात दुचाकी बेफिकीर आणि निष्काळजीपणाने चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सायंकाळी सिक्वेराला अटक केल्यावर दोन स्थानिक हमीवर सुटका करण्यात आली आहे.       

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार दि. १८ रोजी पहाटे ४.३० वा. मित्राबाजार - करंझाळे येथील जेसबन पावलो सिक्वेरा (१९) हा यामहा दुचाकीवर दोघा मित्रांना घेऊन एनआयओ सर्कलकडून राज भवनच्या दिशेने जात होता. यावेळी ब्रिटीश स्मशानजवळ पोहचताच सिक्वेराचा दुचाकीवरचा ताबा गेला आणि त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या  सूचना फलकाला जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेले मित्राबाजार - करंझाळे येथील रुफ आंतोनियो वेल्हो (१६) व सोहेल शेख (१९) हे जागीच ठार झाले.  तर दुचाकीचालक जेसबन पावलो सिक्वेरा याला किरकोळ दुखापत झाली. 

त्यानंतर त्या ठिकाणी पोहचलेल्या पणजी पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनातून त्या दोघांना जीएमसीच्या इस्पितळात नेले. यावेळी डॉक्टारांनी त्या दोघांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांच्या मृतदेहावर शवचिकित्सा करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.

पणजी पोलिस स्थानकाचे हवालदार अनिल कुट्टीकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिस उपनिरीक्षक राजाराम बागकर यांनी दुचाकीस्वार जेसबन पावलो सिक्वेरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी  दुचाकीस्वार सिक्वेराला अटक करून दोघा स्थानिकांच्या हमीवर सुटका केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजाराम बागकर तपास करीत आहेत.