‘बहुरूपी’ कला काळाच्या पडद्याआड


19th January 2018, 06:04 am

क्रांतिराज सम्राट
गोवन वार्ता
पणजी : जगभरात राजेरजवाड्यांच्या काळात शत्रूच्या हालचालींची गुप्तपणे माहिती घेण्यासाठी बहुरूपींचा उपयोग केला जात असे. ज्यांची या कामासाठी निवड केली जात असे ती व्यक्तीही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील बहिर्जी नाईक तर महाराष्ट्राचा बहुरूपी म्हणून सर्वसामान्यांना परिचित होते. मात्र, संस्थाने आणि महाराजांचा काळ संपुष्टात आल्यानंतर लोकशाहीत गुप्तहेर खाते अन्य सरकारी यंत्रणांच्या सहाय्याने हे कार्य करते. त्यामुळे ही कला काळाच्या ओघात गडप होत चालली आहे. परंतु, पारंपरिक पद्धतीने काहीजण आजही त्याचे जतन करताना दिसतात.
सध्या कला अकादमी येथील दर्यासंगमावर लोकोत्सव सुरू आहे. येथे देशभरातील हस्त कारागीर आणि कलाकार आपली कला सादर करण्यासाठी उपस्थित आहेत. रोजच्या वापरातील वस्तूंबरोबरच वाद्यांची विक्रीही करताना दिसतात. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन केले जाते.
लोककला आणि हस्त कारागिरी यांचे संवर्धन करण्याबरोबरच त्याची जगाला ओळख करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. त्यामुळे लोककलाकारांचाही यामध्ये भरणा आहे. लोकोत्सवात संजीव बहुरूपी आणि फारुख बहुरूपी आपल्या कलेने लोकांचे लक्ष वेधून घेताना ही जोडी लोकांचे मनोरंजनही करताना दिसते. त्यामुळे प्रत्यक्ष बहुरूपियांची कला पाहण्याचा आनंद लोकांना मिळत आहे.
संजीव आणि फारुख यांनी गुरुवारी सादर केलेले लखनौचे नबाब आणि त्यांचा सहकारी यांचे पात्र साकारले होते. भारदस्त आवाज, उत्कृष्ट संभाषण आणि आकर्षक पेहराव यांच्या माध्यमातून ते आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत होते. लोकोत्सवात आतापर्यंत त्यांनी जोकर, अल्लादिन, फकीर, दुधवाला, दुधवाली आदींपात्रे साकारून लोकांना हसविण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांकडूनही त्यांच्या कलेला दाद दिली जात आहे.
लोकांच्या चेहऱ्यांवर आनंद पाहून समाधान
आपल्या कलेविषयी बोलताना संजीव म्हणाले, पारंपरिक पद्धतीनेच ही कला आत्मसात केली आहे. याद्वारे जत्रा, उत्सव, लग्नसोहळे आदी ठिकांनी लोकांच्या मागणीनुसार कला सादर करतो. त्याबरोबरच सरकारी महोत्सवातही सहभाग घेऊन कला सादर करत असतो. यातून लोकांना क्षणभर का होईना हसवून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव प्रकट होताना पाहिल्याने समाधान वाटते.