विशेष दंडाधिकाऱ्यांच्या घराची एसीबीकडून उशिरापर्यंत झडती

न्यायालयीन शिपायाने लाच घेतल्याचे प्रकरण


19th January 2018, 03:05 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : गोवा पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात (डी कोर्ट) छापा मारून न्यायालयातील शिपाई तिळू आरोसकर याला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाने  गुरुवारी सायंकाळी विशेष दंडाधिकारी सुदिन सांगोडकर यांच्या दत्तवाडी - म्हापसा येथील घराची झडती घेतली. ही झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.       

या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी विशेष दंडाधिकारी सांगोडकर यांना गुरुवारी सकाळी पथकाच्या आल्तिनो येथील कार्यालयात हजर राहण्यास समन्स जारी केले होते. यानुसार सांगोडकर सकाळी हजर राहिला. त्यानंतर सायंकाळी पथकाने सांगोडकर याच्या घराची झडती सुरू केली आहे.        

भ्रष्टाचारविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा वाहतूक पोलिसांनी  दि. ११ रोजी अंकित साळगावकर यांची जीए-०३ एए-४३०८ या क्रमांकाची खासगी दुचाकी भाड्याने दिल्याच्या आरोपावरून जप्त केली होती. संबंधित दुचाकी सोडविण्यासाठी  संशयित तिळू आरोसकर आणि तक्रारदार अंकित ठरल्याप्रमाणे दि. ११ रोजी सायंकाळी विशेष दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी गेले व अडीच हजार रुपये त्यांना दिले. मात्र विशेष दंडाधिकाऱ्यांनी साळगावकर याला फक्त ५०० रुपयांचा दंड ठोठावला व चलन दिले. त्यानंतर आरोसकर यांनी तक्रारदार साळगावकर 

याच्याकडे दोनशे रुपये कमिशन मागितले.             

या प्रकरणी साळगावकर यांनी पथकाकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली आणि ठरल्याप्रमाणे दि. १२ रोजी सायंकाळी दोनशे रुपये लाच स्वीकारताना संशयित तिळू आरोसकरला भ्रष्टाचारविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले होते.