पर्यटन प्रकल्पांसाठी व्यवस्थापन सल्लागार नेमणार

पर्यटन विकास महामंडळाने मागवले प्रस्ताव


19th January 2018, 05:03 am

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील पर्यटनविषयक साधन सुविधा उभारण्यासाठी प्रकल्पांचा मास्टर प्लान, प्रकल्प अहवाल, शक्याशक्यता अहवाल तयार करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ सल्लागार नियुक्त करणार आहे. त्यासाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
राज्यातील पर्यटन विकासासाठी पूरक असलेल्या गोष्टींचा अभ्यास करणे, पर्यटनस्थळे शोधून काढणे किंवा अधोरेखित करणे आणि त्यानंतर त्यांचा मास्टर प्लान तयार करणे असे काम कंपनीकडे दिले जाईल.
राज्यातील पर्यटन प्रकल्पांसाठी व्यवस्थापन सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचे महामंडळाने ठरवले असून त्यासाठी अनुभवी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन महामंडळ जे विकास प्रकल्प उभारणार आहे त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल, शक्याशक्यता अहवाल आणि मास्टर प्लान तयार करणे हे या सल्लागार कंपनीचे काम असेल.
हे अहवाल तयार करताना कंपनीने प्रकल्पांचे वित्तीय, पर्यावरणीय, तांत्रिक बाजूंनी अभ्यास करून राज्य तसेच केंद्र सरकारकडून प्रकल्पांना मान्यता मिळाल्यानंतर ते सुरू होईपर्यंत पर्यटन विकास महामंडळाला सेवा द्यायची आहे.
१६ फेब्रुवारीपर्यंत कंपन्यांनी आपले इच्छाप्रस्ताव सादर करायचे आहेत, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी निविदा प्रस्तावात म्हटले आहे.