लोकांचे लक्ष वळविण्यासाठी पुतळा उभारणी : चोडणकर

अंदाजपत्रकातील आश्वासन पाळण्यास सरकारला अपयश


19th January 2018, 04:59 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात सध्या पुतळा उभारणीवरून सुरू असलेले राजकारण म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ठरवून केलेले नाटक आहे. त्यांना लोकांमध्ये फुट पाडून त्यांची विभागणी करावयाची आहे. ज्यामुळे लोक मांडत असलेल्या मुद्द्यावरून लक्ष हटविणे सोपे होईल, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत युवा काँग्रेसचे पदाधिकारी सिद्धनाथ बुयांव आणि मारियान रॉड्रिग्स उपस्थित होते. यावेळी बोलताना चोडणकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सादर केलेल्या पहिल्या अंदाजपत्रकात जनमत कौलास ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष ‘अस्मिताय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले होते. मात्र, मागील सात महिन्यांत त्यानुसार कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही. मडगाव येथे झालेला कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम म्हणता येणार नाही. कारण हा कार्यक्रम राजधानीबाहेर आयोजित करण्यात आला होता. त्याबरोबरच विरोधी पक्ष नेत्यांनाही बोलाविण्यात आले नव्हते.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपचा दोन्ही जागांवर पराभव निश्चित आहे. त्यांना लोकांनी विधानसभेत हरवले होते. परंतु, लोकांना हरवून ते पुन्हा सत्तेवर आले, असे चोडणकर म्हणाले. टॅक्सी मालक-चालकांच्या संपासंदर्भात बोलताना ते म्हणाले, तेही गोमंतकीयच आहेत त्यामुळे सरकारने त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये बहुतांश गोमंतकीय युवक आहे. ते आपले भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी मागणी करत आहेत. तर सरकार त्यांना भूतकाळात ढकलत आहे, अशी टीका चोडणकर यांनी सरकारच्या संपाविषयीच्या भूमिकेवर केली.
मुख्यमंत्री पर्रीकर हे पणजीचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी वेळ आणि दिवस ठरवावा. त्यांच्यासोबत पणजीच्या पाणी पुरवठ्यासंबंधी घरोघरी फिरून चर्चा करण्यास तयार आहे. मी त्यांच्याशीच चर्चा करू शकतो. कारण पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत आम्ही आमने-सामने होतो, असेही चोडणकर यावेळी म्हणाले.
..........
लोकांचे लक्ष वळविण्यासाठी पुतळा उभारणी
कोळसा, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, म्हादई, कॅसिनो, प्रादेशिक आराखडा, महागाई, ढासळती आर्थिक स्थिती आणि अंदाजपत्रकात दिलेले आश्वासन पाळण्यात आलेल्या अपयशांमुळे राज्य सरकारवर जनता नाराज आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष या मुद्द्यांवरून दुसरीकडे वळविण्यासाठी पुतळा उभारणीचा मुद्दा सरकारकडून पुढे आणला जात असल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी केली.

भाजप, गोवा फॉरवर्ड अस्मितेच्या शोधात
विधानसभा निवडणुकीत भाजपला लोकांनी विरोध केला होता. मात्र, त्याचा त्यांनी आदर केला नाही. सरदेसाई आणि त्यांच्या पक्षाने गोमंतकीयांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे भाजप आणि गोवा फॉरवर्ड आपली अस्मिता शोधण्याचा प्रयत्न करत असावेत, अशी टीका गिरीश चोडणकर यांनी केली. ते म्हणाले, जनमत कौल वेळेस हे असते तर त्यांनी लोकांचे जनमत झिडकारले असते. भाऊसाहेब बांदोडकरांनी मात्र, बहुमत असूनही जनमताचा आदर करून ते स्वीकारले होते. त्यांनी लोकांचे ऐकले. तर तत्कालीन जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी जनमत कौलाला विरोध केला होता. त्यामुळे भाजपने प्रथम गोमंतकीय जनतेची माफी मागावी, असेही ते म्हणाले.
गुदिन्होला मंत्रिमंडळातून हटवावे : बुयांव
सर्वोच्च न्यायालयाने विद्यमान मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यावरील खटल्याची सुनावणी घेण्यास संमती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना तत्काळ मंत्रिमंडळातून हटवावे, अशी मागणी युवा काँग्रेस कार्यकर्ते सिद्धनाथ बुयांव यांनी यावेळी केली. ही तक्रार पर्रीकर यांनीच दाखल केली होती. मात्र, आता पर्रीकर गुदिन्होंना कसे काय संरक्षण देतात, असेही बुयांव म्हणाले.       

जर नीज गोंयकार सुरक्षित नसतील, तर केवळ वल्गना करून कोणाचे कल्याण होणार आहे. जे जनमत कौलासाठी झगडले, त्यांचा आदर्श राखणे हे पुतळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. - गिरीश चोडणकर, राष्ट्रीय सरचिटणीस, काँग्रेस