मल्याळम अभिनेता सिद्धू पिल्लाईचा हणजूण येथे समुद्रात बुडून मृत्यू


17th January 2018, 03:58 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा :     सुप्रसिद्ध मल्याळम निर्माता पी के आर पिल्लाई यांचा मुलगा प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सिद्धू पिल्लाई (२५, थ्रिशूर - तामिळनाडू) याचा हणजूण समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. सिद्धू याने ‘चिथराम,’ ‘वंदनाम’ व ‘अम्रुथाम गामाया’ अशा १६ मल्याळम चित्रपटांत त्याने भूमिका केल्या आहेत.       

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू पिल्लाईचा वाहून आलेला मृतदेह शुक्रवारी दि. १२ रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास हणजूण किनाऱ्यावर कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यावेळी त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविला होता.    सिद्धू ४ जानेवारी रोजी गोव्यात आला होता व कळंगुट येथे नातेवाईकांकडे उतरला होता. चार दिवस नातेवाईकांकडे वास्तव्य केल्यानंतर ९ रोजी तामिळनाडू येथे जाण्यासाठी गेला. मात्र तो घरी पोहोचला नव्हता. १२ रोजी त्याच्या कुटुंबीयांनी कळंगूट येथील नातेवाईकांकडे त्याची विचारपूस केली असता तो अद्याप घरी पोहोचला नसल्याचे समजले.  सिद्धूने मोबाईल आपल्यासोबत घेतला नव्हता. तो घरी न पोहोचल्याने त्याची नातेवाईकांनी शोध सुरू केला. त्यांना हणजूण येथे एका इसमाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच त्याच रात्री सिद्धूच्या नातेवाईकांनी हणजूण पोलिस स्थानक गाठले. मृतदेहाच्या पोलिसांकडील छायाचित्रानुसार तो सिद्धूच असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली व ही माहिती मयत सिद्धूच्या आई - वडिलांना दिली. सिद्धूची आई १५ रोजी गोव्यात दाखल झाली. सिद्धूच्या हातावरील खुणेवरून तो आपला मुलगाच असल्याचे तिने स्पष्ट केले. मृतदेहाची ओळख पटवून त्याची आई माघारी परतली व दि. १६ रोजी त्यांचे नातेवाईक गोव्यात आल्यावर सिद्धूचा मृतदेह शवचिकित्सेनंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. सिद्धूचा मृतदेह घेऊन ते माघारी परतले. सिद्धू ला पैशांची चणचण भासत होती, अशी माहिती मिळाली आहे.