पर्ये यूथ क्लबची दुसरी पर्ये प्रीमियर लीग स्पर्धा

स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश


17th January 2018, 03:57 am


वार्ताहर। गोवन वार्ता 

केरी-सत्तरी   : पर्ये यूथ क्लबची दुसरी पर्ये प्रीमियर लीग स्पर्धा पर्ये येथील मैदानावर २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी एकूण एक लाख तीस हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव हरवळे येथील सिया गार्डन येथे नुकताच पार पडला. पर्ये पंचायत क्षेत्रातील एकूण बारा वाड्यांवरील एकूण १५० खेळाडूंनी नावनोंदणी केली होती. सहा संघानी या लिलावात भाग घेतला.

रॉयल स्ट्रायकरचे वीरेंद्र गोसावी, सनशाईन क्रिकेटर्सचे अभी मांद्रेकर, हर्ष वॉरियर्सचे अंकुश मांद्रेकर, रायझिंग आर्चर्सचे कुष्ठा गावकर, अमेया अचिव्हर्सचे शशांक गावस, सिरसाट चॅलेंजर्सचे शुभम सिरसाट हे सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजिक कार्यकर्ते विनोद  शिंदे, पी.पी.एल. कमिशनर जितेश काणेकर, आयोजन समिती सचिव वीरेंद्र माजिक, दत्त राणे व विषयांत गावस उपस्थित होते.

यावेळी विनोद शिंदे यांनी मार्गदर्शन केले. लिलाव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्ताराम गावस, प्रज्योत नाईक, श्रीरंग नाईक, संतोष राणे व पर्ये यूथ क्लबच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. गेल्यावर्षी 'से नो टू ड्रग्स' ही थिम या स्पर्धेसाठी ठेवण्यात  आली होती तर यंदा 'बेटी बचाव बेटी पढाव' ही थिम ठेवण्यात आली आहे.

पी.पी.एल.च्या प्रत्येक सामान्यांच्यावेळी मुलींसाठी खास बैठक कक्ष ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २८ फेब्रुवारी रोजी खेळविण्यात येणार 

आहे.