जमशेदपूरचा सामना केरळा ब्लास्टर्सशी

त्यांनी सातत्य राखले


17th January 2018, 03:53 am

जमशेदपूरचा सामना केरळा ब्लास्टर्सशी   

जमशेदपूर : इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) केरळा ब्लास्टर्सची अडखळती वाटचाल अचानक थांबली असून त्यांनी सातत्य राखले आहे. अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने त्यांनी आगेकूच सुरू केली आहे. डेव्हिड जेम्स मुख्य प्रशिक्षक म्हणून परतल्यानंतर अपराजित मालिका राखलेल्या ब्लास्टर्सला रोखण्याचा स्टीव कॉप्पेल यांच्या जमशेदपूर एफसीचा प्रयत्न राहील. बुधवारी हा सामना होत आहे.

ब्लास्टर्स फॉर्मात आल्यामुळे या लढतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईत १-० असा विजय मिळविलेल्या ब्लास्टर्सचा आत्मविश्वास उंचावला आहे. आधीचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांच्याकडे सुत्रे असताना इयन ह्युमला मैदानावर उतरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. आता जेम्स यांच्याकडे सुत्रे येताच त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. जेम्स यांच्यामुळे ब्लास्टर्सने आक्रमक खेळ सुरु केला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर जमशेदपूरचा संघ दडपणाखाली ब्लास्टर्सच्या आक्रमणाचा कसा सामना करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

कॉप्पेल यांनी आधी ब्लास्टर्सला मार्गदर्शन केले होते. आता ते जमशेदपूरचे मार्गदर्शक आहेत. साहजिकच ही मुद्दा चुरस वाढविण्यात महत्त्वाचा ठरेल. अशा लढतीचा शेवट वादग्रस्त होऊ नये म्हणून पंचांची कामगिरी उच्च दर्जाची व्हावी लागेल, असे कॉप्पेल यांनी स्पष्टपणे सांगितले.

ते म्हणाले की, आतापर्यंतच्या चित्रानुसार पंचांची कामगिरी अपेक्षित दर्जाची झालेली नाही. अनेक सामन्यांत पंच कमी पडले. त्यावेळी मोक्याच्या क्षणी त्यांनी दिलेले निर्णय महत्त्वाचे ठरले आणि अखेरस त्यावरूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मी व्हिडीओ तंत्रज्ञानाचा समर्थक आहे. प्रत्येक सामन्याचे प्रक्षेपण करण्यासाठी दहा कॅमेरे वापरले जात आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञनाचा वापर करण्यास हरकत नसावी. इंग्लंडमध्ये याचा वापर होतो आणि एकूण उपयुक्तता सकारात्मक आहे.

कॉप्पेल यांनी त्याचवेळी पंचांविषयी सहानुभूती व्यक्त केली. पंच दडपणाखाली येत असून त्यांना व्हिडीओ तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज असल्याचे कॉप्पेल यांनी नमूद केले.