भगवती विद्यालयाला अजिंक्यपद


16th January 2018, 03:35 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पेडणे : गोवा क्रीडा व व्यवहार खाते पणजी आयोजित पेडणे तालुका पातळीवरील शालेय क्रिकेट स्पर्धेत श्री भगवती हायस्कूलच्या मुलांनी अंतिम स्पर्धेत कोरगावच्या कमळेश्वर हायस्कूल पेठेचावाडा यांचा ९ धावांनी पराभव करुन अजिंक्यपद पटकावले. हा सामना रोमांचक 

झाला. 

नाणेफेकीचा कौल श्री भगवती विद्यालयाने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारुन २० षटकात ९४ धावांचे आवाहन कमळेश्वर हायस्कूलला देण्यात आले. यामध्ये गंगाराम परब १८ धावा, साईश खोत १६ धावा, शंकर तळावणेकर यांनी १६ धावा केल्या. उत्तरादाखल कमळेश्वर हायस्कूल २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात ८५ धावा करू शकला व भगवती हायस्कूलचे गोलंदाज रोहन झांटये, सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर सर्वेश तळावणेकर याने चार गडी बाद करून भगवती विद्यालयाला अजिंक्यपद मिळवून दिले.      

या संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक नवल नारोजी व कांचन नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. 

त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन शिक्षक वर्ग तसेच पालक शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत 

आहे.