कर्नाटककडून कळसा - भांडुराचे काम सुरूच

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; काम बंद करण्यासाठी पत्र पाठविण्याचे आदेश

13th January 2018, 03:28 Hrs
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी/वाळपई : कर्नाटक सरकारने म्हादई नदीचा प्रवाह रोखून कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम सुरूच ठेवल्याचे शुक्रवारी पुन्हा उघड झाले. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला दिलेल्या भेटी दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांना तत्काळ कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून हे काम बंद करण्याचे आदेश जारी करावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हादईप्रश्नी कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना पाठविलेले पत्र आणि त्याविरोधात उठलेले वादळ नुकतेच शांत होण्याच्या मार्गावर असतानाच शुक्रवारी कर्नाटकचे छुपे डाव सुरूच असल्याचे उघड झाले. जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी पुढाकार घेऊन खात्याच्या अधिकाऱ्यांचे एक पथक कर्नाटकात पाठविले होते. या अधिकाऱ्यांना पाहणी दरम्यान कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम सुरूच असल्याचे निदर्शनास आले. या घटनेचे फोटो आणि छायाचित्रीकरणही करण्यात आले आहे.
कर्नाटकने कळसा-भांडुरा परिसरात पुन्हा सुरू केलेल्या कामाचे पुरावे आपल्याकडे आले असून, सोमवारी म्हादई पाणी तंटा लवादात होणाऱ्या सुनावणीवेळी ते सादर करण्यात येतील. शिवाय कर्नाटक सरकारलाही आम्ही ते पाठवून देणार आहोत.
-विनोद पालयेकर, जलस्रोतमंत्री
म्हादईप्रश्न पुन्हा पेटणार?
म्हादई बचाव आंदोलनाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी कर्नाटकच्या छुप्या कृत्यांची माहिती दिल्यानंतर सरकारी यंत्रणा यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू असलेल्या भागाची भेट देऊन पाहणीही केली असता कर्नाटकने पाण्याचा प्रवाह वळविला असल्याचे दिसून आले. यामुळे राज्यात पुन्हा एकदा म्हादईप्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Top News

अनधिकृत बांधकामांच्या मुदतवाढीला मान्यता

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर अध्यादेश Read more

सरकारी नोकऱ्यांचा विषय तापला

खासगी उद्योगांना मनुष्यबळाचा तुटवडा; ‘ना हरकत’ची अट अन्यायकारक Read more

उपनिरीक्षक रेडकर यांची बदली

मृताच्या मित्राला शिवीगाळ केल्याचे प्रकरण Read more

पेडण्यातील सहा शाळांत ‘स्मार्ट’ वर्ग

सामाजिक सेवा उपक्रमाअंतर्गत जीएमआरची योजना Read more

बारावीचा निकाल येत्या शनिवारी

एसएमएस, आयव्हीआरएसद्वारेही निकाल पाहण्याची सुविधा Read more