विज्ञान चित्रपट महोत्सव १६ पासून


13th January 2018, 02:24 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : देशात विज्ञानविषयक चित्रपट निर्मितीला चालना देण्याच्या हेतूने गोवा विज्ञान परिषदेच्यावतीने तिसऱ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन १६ ते १९ जानेवारीला करण्यात आले आहेत.
महोत्सवात ब्लॉकबस्टर सिनेमांचे स्क्रीनिंग, नामवंत वैज्ञानिकांबरोबर संवाद, कार्यशाळा आणि स्पर्धा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती गोवा विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक उपस्थित होते.
भारतात विज्ञानविषयक फिल्म्स निर्मितीला चालना देण्याच्या हेतूने याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, एनसीएओआर, जीएसएसबी, गोवा विज्ञान केंद्र, विग्यान परिसर, दिल्ली यांचा पाठिंबा लाभलेला आहे.
या वर्षाच्या विज्ञान फिल्म स्पर्धेसाठी गोव्यातील विविध मीडिया महाविद्यालयांतून १० प्रवेशिका आल्या आहेत. स्पर्धेचे विजेते १६ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहेत, असे सुहास गोडसे यांनी सांगितले.