बिस्मार्क खून प्रकरणी तपासाला अतिरिक्त आठ आठवड्यांची मुदत


12th January 2018, 03:49 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सामाजिक कार्यकर्ते बिस्मार्क डायस यांच्या खुनाचा तपास पूर्ण करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाला अतिरिक्त आठ आठवड्यांची मुदत दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते बिस्मार्क डायस ५ नोव्हेंबर २०१५ रोजी स्थानिक युवकांसह सांतइस्तेव येथील बाबर बांध येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. बिस्मार्क बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी जुने गोवे पोलिस स्थानकात दिली होती. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह सांतइस्तेव खाडीत आढळून आला होता. डायस यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आक्षेप त्यांच्या कुटुंबियांनी घेतल्यानंतर सरकारने हे प्रकरण तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित केले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने मृतदेहाची पुन्हा शवचिकित्सा करून व्हिसेरा व इतर अवयव हैदराबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले. अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने ११ मार्च २०१६ रोजी बिस्मार्क डायस यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली. अहवालानुसार जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे प्रकरण बंद केले होते. त्यानंतर बिस्मार्क यांच्या नातेवाईक व हितचिंतकांनी गुन्हा अन्वेषण विभागाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले होते.