पर्वरीत महसूल भवनासह आपत्ती व्यवस्थापन केंद्र

12th January 2018, 03:47 Hrs
विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पर्वरी येथे महसूल भवन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचे निश्चित झाले असून, गृहनिर्माण मंडळाकडून सुमारे ६ हजार चौरस मीटर जमीन घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, महसूल मंत्री रोहन खंवटे आणि गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत झाला.
पर्वरीत जमिनीचा दर हा ५० हजार रुपये प्रती चौरस मीटर आहे. गृह निर्माण मंडळाजवळ पर्वरीतील दोन भूखंड असून, ते दोन्हीही ३५ हजार रुपये प्रती चौरस मीटर दराने महसूल खात्याने घ्यावे असे बैठकीत ठरले. एका भूखंडात महसूल भवन उभारावे, त्यात बार्देश परिसरातील महसूल खात्याशी संबंधित सर्व कार्यालये येतील, तर दुसऱ्या भूखंडात राज्यासाठी हवे असलेले आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारावे असे बैठकीत ठरले आहे. जमीन खरेदी करण्यासाठी महसूल खात्याला सुमारे २० कोटी रुपये खर्च येईल. बार्देश तालुक्यातील महसूल खात्याशी संबंधित अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच इतर विभागाची कार्यालये एकत्र आणण्यासाठी महसूल भवन उभारण्याचा महसूल मंत्री रोहन खंवटे यांचा प्रस्ताव आहे. गुरुवारच्या बैठकीत ही जमीन गृहनिर्माण मंडळाकडून विकत घ्यावी आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची व्यवस्था करण्याचेही सरकारने ठरविले आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राची उभारणी जलस्रोत खात्यामार्फत होते. जागतिक बँक त्यासाठी निधी देते. त्यामुळे दुसऱ्या भूखंडात सुसज्ज असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more