कळंगुट, कांदोळी, ताळगाव, पर्वरी नगरपालिकांसाठी सक्षम : डिसोझा

12th January 2018, 03:44 Hrs
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : कळंगुट, कांदोळी आणि ताळगाव या पंचायती नगरपालिका होण्यास सक्षम आहेत. काही पंचायती इतर पालिकांमध्ये समावेश करण्याच्या नियमात बसणाऱ्या आहेत. मात्र त्यासाठीचा निर्णय पंचायतीने घ्यावयाचा आहे, असे नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राज्यातील अनेक पंचायती नगरपालिकांत समाविष्ट होऊ शकतात. नगरपालिका होण्यासाठी जेवढी हवी, तेवढी लोकसंख्या कळंगुट, कांदोळी आणि ताळगाव या ग्रामपंचायत क्षेत्रात आहे. याशिवाय पर्वरी, सुकूर व अन्य एक पंचायत मिळून एक नगरपालिका होऊ शकते. राज्यात अन्य ठिकाणीही तीन ते चार पंचायती मिळून नगरपालिका होऊ शकतात किंवा त्या पंचायती नगरपालिकांत समाविष्ट होऊ शकतात. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे, असे डिसोझा म्हणाले. नगरपालिका होण्यासाठी प्रस्ताव आला नसला, तरी पंचायतींनी सकारात्मक भूमिका घेतल्यास व विरोध न झाल्यास ते शक्य असल्याचे ते म्हणाले.
पालिका मूल्यांकन कायद्याची गरज
फ्रान्सिस डिसोझा म्हणाले, आमदारांच्या कामाचे ज्या पद्धतीने मूल्यांकन होते, तसेच नगरसेवकांच्या कामाचेही होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका मूल्यांकन कायदा होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व नगरपालिकांमध्ये कॉमन केडरची मागणी होत असली, तरी त्यासाठी कामगार युनियनचा प्रखर विरोध आहे. त्यामुळे कॉमन केडर लागू करण्यासाठी पालिका क्षेत्रातील कामगारांचे एकमत असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 ‘रेरा'ची वेबसाईट १७ पासून
‘रेरा' कायद्यासाठी नवीन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा शोधण्याचे कामही सुरू आहे. ‘रेरा'ची वेबसाईट १७ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर सर्व बिल्डरांना आपल्या प्रकल्पाची ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिली.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more