जीएसटीमुळे पीडब्ल्यूडीची कामे खोळंबली : डिसोझा


12th January 2018, 05:56 am
जीएसटीमुळे पीडब्ल्यूडीची कामे खोळंबली : डिसोझाप्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) कामे करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाला २५ कोटी रुपये देण्याचे ठरले आहे. त्यासाठी या कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. पण, त्याची जीएसटी ठरली नसल्याने म्हापशातील कामे खोळंबली आहेत. इतर मतदारसंघांतही हिच परिस्थिती असल्याने त्याचा दोष नगरविकास मंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी केंद्राला दिला आहे.
फ्रान्सिस डिसोझा म्हणाले, म्हापसा शहरात गेली तीन वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याची मोठी कामे झाली नाहीत. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रत्येक मतदारसंघाला २५ कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्या कामांसाठीचे प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आले आहेत. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, त्या कामांची जीएसटी ठरली नाही. प्रत्येक कामासाठी वेगवेगळा जीएसटी लागू होतो. तो लागू करण्यात आला नसल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे रखडली आहेत. त्यामुळे विकासकामात जीएसटी अडथळे ​आणत आहे. जीएसटी लागू करून निविदा काढणे आवश्यक हाेते, असेही डिसोझा म्हणाले.

जीएसटी संदर्भातील देशभरात झालेल्या पाच ते सहा बैठकामध्ये मी स्वत: सहभागी झालो होतो. त्यामध्ये जीएसटीविषयी प्रत्येक राज्यांत वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे जीएसटी संभ्रमात आहे.- अॅड. फ्रान्सिस डिसोझा, नगरविकास मंत्री