चौकांचे ‘जनमत कौल, केणी' नामकरण होणार!

मडगाव पालिका मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर


12th January 2018, 06:54 am


प्रतिनिधी । गोवन वार्ता
मडगाव : जुन्या बाजारातील कोलवा वाहतूक बेटापासून रवींद्र भवनपर्यंतच्या चौकाला जनमत कौल व पांडवा चॅपेल चौकाला ज्येष्ठ पत्रकार कै. चंद्रकांत केणी यांची नावे देण्याचा ठराव पालिका मंडळाच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला.
पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, पालिका मंडळाने जनमत कौलाच्या समारंभ सोहळ्याच्या दिनी रस्त्यांवर राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या छायाचित्रांसोबत माहितीचे फलक लावण्याचा निर्णयही या विशेष बैठकीत घेतला आहे. त्यात डॉ. जॅक सिक्वेरा, पुरुषोत्तम काकोडकर, रवींद्र केळेकर, चंद्रकांत केणी, उल्हास बुयांव, शाबू देसाई, एनियो पिमेंता, डॉ. लुईस प्रोत बार्बोसा, शंकर भंडारी, श्रीपाद घारसे, व्हिक्टोरीया फर्नांडिस, निर्मला सावंत, वासुदेव सरमळकर, विजयाबाई सरमळकर, अॅड. उदय भेंब्रे, एरास्मो डि सिक्वेरा, वासुदेव साळगावकर, उर्मिला लिमा लैतांव, डॉ. आल्वारो डि लॉयेला फुर्तादो, डॉ. विनायक मयेकर, लक्ष्मणराव सरदेसाई, सी.पी. डि कॉस्ता, सुहासिनी तेंड‍ुलकर, तियोतिनो पेरेरा, जनार्दन फळदेसाई, कार्मो रॉड्रिग्स, अनंत (बाबू) नरसिंह नायक, नरसिंह दामोदर नायक, एम. बॉयर, बाबुराव केरकर, शांताराम म्हांबरे, डॉ. सेबास्तियाव माझारेलो, जुवांव मारियान डिसोझा, ऑर्लांदो सिक्वेरा लोबो, ज्योकिम आरावजो व डॉ. मावरीलियो फुर्तादो यांचा समावेश आहे.
रवींद्र भवनात १६ रोजी जनमत कौल समारंभ
मडगाव येथील रवींद्र भवनात मंगळवार, दि. १६ रोजी सरकारमान्य जनमत कौल समारंभ होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व इतर मान्यवर समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी जनमत कौल चौक व कै. चंद्रकांत केणी चौक यांचे नामकरण होणार आहे.