बाणावलीत कारच्या धडकेत महिला ठार


31st December 2017, 04:21 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : बाणावली येथील मारिया हॉल जंक्शनजवळ पुण्यातील पर्यटकांच्या कारची धडक बसल्याने फ्लोरियाना गोंयस ( वय ६५) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. या अपघात प्रकरणी कोलवा पोलिसांनी वाहन चालक आंजेलो फर्नांडिस (वय ५२) याच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला
आहे.
कोलवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक फिलोमेन कॉता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ठार झालेली महिला शनिवारी सकाळी बाजार आणण्यासाठी मडगावच्या मार्केटमध्ये गेली होती. ती बसने दुपारी घरी परतली. बाणावलीच्या मारिया हॉल जंक्शनजवळ बसमधून उतरून रस्ता ओलांडून घरी जाण्याच्या प्रयत्नात असताना कोलवाच्या दिशेने वळण
घेतलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या वाहनाने तिला धडक दिली. त्या धडकेमुळे ती महिला रस्त्यावर पडली. यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेत तिला हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले. मात्र, डॉक्टरानी तिला मृत घोषित
केले. कोलवा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून (एमएच १२-एमबी-१२३०) महिंद्रा जीप जप्त केली. अपघात प्रकरणी कोलवा पोलिस पुढील तपास करीत
आहेत.