शाळांतून अभ्यासेतर उपक्रम राबविण्याची गरज : राज्यपाल सिन्हा

31st December 2017, 06:21 Hrs
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : शैक्षणिक संस्थांतून अभ्यासेतर उपक्रम राबविण्याची गरज आहे. तसेच शाळांतून देशहितासाठी काम करणारे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शनिवारी केले.
राजीव गांधी कलामंदिर येथे आयोजित कवळे येथील श्री सरस्वती ज्ञानप्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, कवळे सरपंच राजेश कवळेकर, प्रमुख वक्ते दिलीप बेतकीकर, जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, संस्थाध्यक्ष अॅड. संतोष रामनाथकर, राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते.
यावेळी सिन्हा पुढे म्हणाल्या की, समाजाच्या स्वास्थ्यासाठी भेदभावाच्या भिंती मोडून टाकल्या पाहिजेत. विकास साध्य करण्यासाठी या गोष्टींवर मात करण्याची गरज आहे. आजच्या काळात आम्हाला मुलांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांच्यावर चांगले गुण रुजवून त्यांना चांगले नागरिक बनवू शकतो. याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवरही आहे, असे राज्यपाल सिन्हा यांनी म्हटले.
आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, पोर्तुगीजांनी गोव्यातील शिक्षण, कला व संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, १९४३ साली उभारलेल्या या संस्थेने जोमाने काम करून शिक्षित समाज घडविला. या विद्यालयातील अनेक विद्यार्थी राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुढे गेले आहेत. शिक्षणाबरोबर चांगले संस्कारही फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कवळे सरपंच राजेश कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, अॅड. संतोष रामनाथकर, राजेंद्र बोरकर यांचीही भाषणे झाली. तसेच राजाराम कपलेश्वरकर,पांडुरंग सावर्डेकर, रामदास कवळेकर यांचा राज्यपाल सिन्हा यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. राजेंद्र बोरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अॅड. संतोष रामनाथकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन उर्वशी कवळेकर यांनी केले.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more