पेडणेत कार्निव्हल सर्वधर्मसमभाव संस्कृती राखण्यासाठी

मंत्री आजगावकर यांचे प्रतिपादन : राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून कार्निव्हल विरोधी घोषणा


31st December 2017, 06:20 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मोरजी : गोमंतकात आजपर्यंत एकोप्याने नांदणारी सर्वधर्मसमभाव संस्कृती अबाधित राखण्यासाठीच पेडणे येथे यावर्षीपासून कार्निव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.
पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात कार्निव्हल आयोजनाबाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी नगराध्यक्ष उषा नागवेकर, पेडणेचे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, परशुराम कोटकर, डॉ. वासुदेव देशप्रभू, पर्यटन महामंडळाचे संचालक जीत आरोलकर, पांडुरंग परब, चांदेल- हंसापुर सरपंच संतोष मळीक, ताम्बोसे सरपंच पल्लवी राऊळ, पोरस्कडे सरपंच सत्यवान गावकर, विर्नोडा सरपंच भरत गावडे, धारगळ सरपंच वल्लभ वराडकर, विर्नोडाच्या उपसरपंच दीपाली परब, तोर्सेच्या उपसरपंच सरस्वती नाईक, पोरस्कडे उपसरपंच फ्रान्की परेरा, नगरसेवक सुविधा तेली, बाबी तिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी आजगावकर म्हणाले, गोवा हा समस्त गोवेकरांचा आहे. त्यामुळे गोवेकरांना काय पाहिजे, हे गोवेकर ठरवतील. कार्निव्हलला विरोध करायचा असल्यास म्हापसा, पणजी, वास्को, मडगाव, सावर्डे याठिकाणी सर्वप्रथम करावा. लोकांच्या आग्रहास्तव पेडण्यात कार्निव्हल घेऊन संघटितपणाचे दर्शन घडवू, असेही सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू म्हणाले, शिमगोत्सवाचा आनंद घेणाऱ्या पेडणेकरांना आता कार्निव्हलची मौजमजा लुटण्याची संधी मंत्री बाबू आजगावकर यांच्यामुळे मिळाली आहे. पेडणे शहरात कार्निव्हल मिरवणुकीसाठी जागा अपुरी पडणार असल्याने हा कार्निव्हल मोरजी, मांद्रे, हरमलसारख्या किनारपट्टी भागात व्हावा, अशी सूचना केली. कार्निव्हल ही पेडणेकरांसाठी अपूर्व संधी आहे. ख्रिस्ती बांधवाबरोबर आपणही त्यात सामील होऊन आनंद लुटूया, असे पांडुरंग परब म्हणाले.
चांदेल- हंसापूरचे सरपंच संतोष मळीक म्हणाले, कार्निव्हल गेली अनेक वर्षे गोव्यात होतो. मात्र, याठिकाणी विरोध झाला नाही. मात्र राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली काही धर्मांध पेडण्यात विरोध करू पाहत आहे. त्यांनी प्रथम गोव्यातील कार्निव्हल बंद करावा. त्यानंतरच पेडण्यात विरोध करावा, असे सांगितले.
यावेळी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कार्निव्हला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाचे विनायक च्यारी यांनी सभेत बोलण्याची परवानगी मागितली. त्यांना परवानगी दिल्यानंतर ज्या पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले. त्या जुलमी सत्तेचे प्रतीक असलेला कार्निव्हल करावा की, नाही याबद्दल आयोजकांनी विचार करावा, असे सांगितले. या विधानानंतर त्यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी सभा स्थळ सोडले. त्यानंतर राष्ट्रप्रेमी नागरिकही कार्निव्हल विरोधात घोषणा देत निघून गेले. सूत्रसंचालन पांडुरंग परब यांनी केले. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सोपटे यांचा कार्निव्हलला विरोध
आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदारसंघातील कार्निव्हल मिरवणुकीला विरोध असल्याचे सांगितले. मांद्रे मतदारसंघात कार्निव्हल कदापि होऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे पेडण्यात होऊ घातलेला कार्निवल होण्याआधीच रंगणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.