दक्षिण गोवा पोलिसांकडून १,२५३ पैकी १,०५४ प्रकरणांचा छडा

२०१७ मध्ये पोलिसांची यशस्वी कामगिरी : पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांची माहिती


30th December 2017, 03:18 am
विठ्ठल सुकडकर
गोवन वार्ता
मडगाव : दक्षिण गोव्यात १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०१७ पर्यंत विविध पोलिस स्थानकांत एकूण १,२५३ गुन्हेगारी प्रकरणांची नोंद झालेली असून, त्यापैकी १,०५४ प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी ‘गोवन वार्ता'शी बोलताना दिली.
दक्षिण गोव्यातील महत्त्वपूर्ण गुन्ह्यांत १८ खुनाची प्रकरणे नोंद झाली आहेत. खुनाचे प्रयत्न ९, सदोष मनुष्यवध १ व बलात्काराची ३७ प्रकरणे नोंद झाली आहेत. यापैकी सर्वाधिक प्रकरणे फोंडा पोलिस स्थानकात (१०) नोंद झाली आहेत. त्यानंतर मडगाव शहर पोलिस स्थानक (९), वास्को पोलिस स्थानक (६), मायणा-कुडतरी पोलिस स्थानक (६), कुडचडे पोलिस स्थानक (५), कोलवा पोलिस स्थानक (४), कुंकळ्ळी पोलिस स्थानक (४), फातोर्डा (४), केपे (४), वेर्णा (४), सांगे (३), काणकोण (३) व कुळे पोलिस स्थानकाचा (२ प्रकरणे) क्रमांक लागतो.
२०१६ साली १६ खून प्रकरणे नोंद होऊन १४ प्रकरणांचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले होते. टक्केवारीनुसार गेल्यावर्षी ८२ टक्के गुन्हेगारीच्या प्रकरणांचा छडा लागलेला होता. तर यावर्षी ८४ टक्के प्रकरणांचा छडा लागलेला आहे. यावर्षी एका दरोड्याच्या प्रकरणाची नोंद झालेली असून, पोलिसांनी त्यातील गुन्हेगारांना गजाआड केले आहे. गेल्यावर्षी दोन दरोड्याच्या प्रकरणांची नोंद झाली होती. यावर्षी ९ जबरी चोऱ्या झालेल्या असून, सर्व प्रकरणांचा तपास लागलेला आहे. गेल्यावर्षी ९ जबरी चोऱ्या झाल्या होत्या, त्यापैकी ७ चोऱ्यांचा तपास लागलेला होता. यावर्षी १२ घरफोड्या झालेल्या असून ३ घरफोड्यांचा तपास लागलेला आहे. रात्रीच्या वेळी ५८ चोऱ्या झालेल्या असून २४ प्रकरणांचा तपास लागलेला आहे. महिलांच्या गळ्यातील सुवर्णालंकार, सोनसाखळ्या व इतर प्रकारच्या चोऱ्या मिळून यावर्षी ५० प्रकरणांची नोंद झालेली आहे. त्यापैकी ३३ प्रकरणांचा छडा लागलेला आहे. या सर्व प्रकारच्या चोऱ्यांचा सर्वाधिक आकडा मडगाव शहर पोलिस स्थानकात नोंद झालेला आहे. त्याखालेखाल फोंडा पोलिस स्थानकात ३५, तर वास्को पोलिस स्थानकात २६ चोऱ्यांच्या प्रकरणांची नोंद झालेली आहे. वर्षभरात फसवणुकीची ४४ प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यापैकी ३८ प्रकरणांचा छडा लागलेला आहे. यावर्षी २९ अपहरणाच्या तक्रारी नोंद झाल्या होत्या, त्यापैकी २८ प्रकरणांचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा अपघाताच्या प्रमाणात घट झालेली आहे. यंदा ११३ भीषण अपघात घडलेले आहेत. त्यापैकी १०१ अपघातांचा पोलिसांनी तपास करून वाहन चालकांविरूद्ध आरोपपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत. गेल्यावर्षी १३१ अपघात झाले होते. त्यापैकी १२३ अपघातांचा तपास करून न्यायालयात आरोपपत्रे दाखल केली होती.
५९ अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई
दक्षिण गोव्यात यावर्षी सर्वाधिक ५९ अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना गजाआड केले आहे. गेल्यावर्षी १३ अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. अमली पदार्थांचे सर्वाधिक १६ खटले मडगाव शहर पोलिस स्थानकात नोंद झालेले आहेत. त्यानंतर वास्को पोलिस स्थानकाचा क्रमांक लागतो. तेथे १४ खटले नोंद झालेले आहेत. शहर परिसरात रस्ते, पदपथ व सार्वजनिक ठिकाणी व्यापार मांडून बसलेल्या ३,७०१ विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्यावर्षी १,०९० विक्रेत्यांवर कारवाई केली होती. यावर्षी पोलिसांनी ३१९ भिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. कॉट्पा कायद्याखाली ७,२०७ प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. गेल्यावर्षी या कायद्याखाली २,७२२ प्रकरणे नोंद केली होती.
१९६ चोऱ्यांची प्रकरणे नोंद
दरोडे, चोऱ्या, घरफोड्या व अन्य प्रकारच्या छोट्या-मोठ्या चोऱ्यांचा आढावा घेतला असता, यंदा दक्षिण गोव्यात १९६ चोऱ्यांची प्रकरणे नोंद झालेली आहेत. गेल्यावर्षी २४६ चोरीच्या प्रकरणांची नोंद झाली होती. यंदा पोलिसांनी ४९ टक्के चोऱ्यांचा छडा लावलेला आहे, तर गेल्यावर्षी ४५ टक्के चोऱ्यांचा छडा लावला होता.