वास्कोत चोरट्यास अटक; मौल्यवान ऐवज हस्तगत

रेल्वे पोलिसांची कामगिरी; पथकाला पाच हजारांचे बक्षीस जाहीर


30th December 2017, 03:17 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
वास्को : प्रवाशांचे दागिने, रोकड लंपास करणाऱ्या जयराज हिराजी पाटील (१९) या चोरट्याला वास्को रेल्वे पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील सहा लाखांचे सोन्याचे दागिने, अठरा हजारांचे चार मोबाईल, दोन पॉवर बँक, एक लेडिज पर्स तसेच १७ हजार ६०० रुपयांची रक्कम वास्को रेल्वे पोलिसांनी हस्तगत केली. वास्को रेल्वे पोलिसांनी बजाविलेल्या या कामगिरीबद्दल दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी वास्को रेल्वे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर व पथकाला पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
जयराज पाटील हा वरगापूर-बेळगाव येथील रहिवाशी आहे. वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वास्को -तिरूपती रेल्वेने जयराज वास्को रेल्वे स्थानकावर उतरला होता. तो फलाटावर संशयास्पदरित्या चालत असल्याचे पाहून तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसाने त्याला हटकले. त्यानंतर त्याच्याकडील साहित्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे चोरीचा माल सापडला. रेल्वे प्रवासामध्ये त्याने काही प्रवाशांचे दागिने, मोबाईल, रोकड लंपास केल्याचा संशय आहे. वास्को रेल्वे पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे. उपअधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत सांगोडकर पुढील तपास करीत आहेत.