ऐतिहासिक चार दिवसीय कसोटी दोन दिवसात आटोपली

एकमेव सामन्यात दक्षिण आफ्रिकेनडून झिंबाब्वेचा डावाने पराभव


28th December 2017, 09:47 pm
ऐतिहासिक चार दिवसीय कसोटी दोन दिवसात आटोपलीपोर्ट एलिझाबेथ :
दक्षिण आफ्रिकेने सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या चार दिवसीय दिवस - रात्रीच्या कसोटी सामन्यात पाहुण्या झिंबाब्वेचा डाव आणि १२० धावांनी पराभव केला. या दौऱ्यात झिंबाब्वेला एकच कसोटी सामना खेळायचा होता.
चार दिवसीय हा सामना केवळ दोनच दिवसांमध्ये आटोपला. मागच्या ५० वर्षांमधील हा दुसरा सर्वांत लहान कसोटी सामना ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाचा वाटा उचलला.
यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व आपल्या पहिल्या डावात पहिल्याच दिवशी ९ गड्यांच्या मोबदल्यात ३०९ धावा करत डाव घोषित केला. यानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी झिंबाब्वेचा पहिला डाव ६८ आणि दुसरा डाव १२१ धावांवर आटपत डावाने विजय मिळवला.
आफिकेसाठी पहिल्या डावात वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्कलने ५ गडी बाद केले तर दुसऱ्या डावात फिरकीपटू केशव महाराजने यश मिळवले. दोन्ही डावात झिंबाब्वेचा एकही फलंदाज अर्धशतकही लगावू शकला नाही. पहिल्या डावात तर पाहुण्या संघाचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. या डावात झिंबाब्वेसाठी काईल जावरिसने २३ तर रायन बर्लने १६ धावा केल्या.
झिंबाब्वेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात पहिल्या डावाच्या तुलनेत चांगला खेळ दाखवला मात्र या डावातही त्यांचे एकंदरीत प्रदर्शन निराशाजनक राहिले. या डावात ५ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले मात्र एकही फलंदाज २३ या वैयक्तिक धावसंख्येपेक्षा जास्त धावा काढू शकला नाही. क्रेग इरविनने सर्वाधिक २३ धावा केल्या. कर्णधार ग्रेम क्रेमरने नाबाद १८ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघासाठी एडिन मार्करामने २०४ चेंडूत १४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार एबी डिव्हिलियर्सने ५३ धावा केल्या होत्या.