अॅलिस्टर कुकचे नाबाद द्विशतक

चौथ्या अॅशेस कसोटी मालिकेत इंग्लंड मजबूत


28th December 2017, 09:46 pm
अॅलिस्टर कुकचे नाबाद द्विशतकमेलबर्न :
अॅलिस्टर कुकच्या (नाबाद २४४) नाबाद द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ९ गडी गमावून ४९१ धावा करत स्वत:ची स्थिती मजबूत केली. कुकने आपल्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे द्विशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३२७ धावांच्या आधारावर इंग्लंडने १६४ धावांची आघाडी मिळवली आहे.
तिसऱ्या दिवशी दोन बाद १९२ धावांवरून पुढे खेळण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने २१८ धावांवर दिवसातील पहिला गडी कर्णधार जो रूटच्या (६१) रुपात गमावला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीत रूट बाद झाला. १३३ चेंडूंचा सामना करताना रूटने ७ चौकार लगावले. रूट बाद झाल्यानंतर सलामीवीर कुकल बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र कुकला बाद करण्यात त्यांना अपयशच आले.
स्टुअर्ट ब्रॉडचे अर्धशतक
दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या इतर फलंदाजांना बाद करत इंग्लंडचा डाव लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रूट बाद झाल्यानंतर इतर ५ फलंदाज डेव्हिड मलान (१४), जॉनी बेयरस्टो (२२), मोईन अली (२०), ख्रिस वोक्स (२६) आणि टॉम कुरान (४) जास्त वेळ मैदानात टिकू शकले नाहीत. कुरान लवकर बाद झाल्यानंतर कुकला सोबत देण्यासाठी आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने (५६) कुकसोबत १०० धावांची शतकी भागीदारी करताना संघाची धावसंख्या ४७३ पर्यंत पोहोचवली.
कुकने लाराला पछाडले
कुकने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत विंडीजच्या ब्रायन लाराला मागे टाकले आहे. लाराने ३४ शतक आणि ४८ अर्धशतकांच्या जोरावर १३१ सामन्यांमध्ये ११,९५३ धावा केल्या होत्या तर कुक त्याच्याही पुढे गेला आहे. कुकने आतापर्यंत १५१ सामन्यांमध्ये ११,९५६ धावा केल्या आहेत. यात ३२ शतके व ५५ अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंडतर्फे द्विशतक लगावणारा दुसरा फलंदाज
इंग्लंडसाठी सर्वाधिक द्विशतक लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुक दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हे स्थान त्याने लेन हटनला मागे टाकत मिळवले आहे. हटनने ४ द्विशतके लगावली होती. वेली हॅमंड यांच्या नावावर ७ द्विशतके आहेत व ते पहिल्या स्थानावर आहेत. केविन पीटरसनच्या नावावर ३ द्विशतके आहेत.