गोव्याच्या महिला संघाला जेतेपद

वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा : बंगालला ३७ धावांनी नमवले


28th December 2017, 03:41 am
कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी गोव्याच्या महिलांनी बंगाल संघाचा ३७ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. कोलकाता येथील इडन गार्डन मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. गोव्याच्या महिला संघाने या विजयाने राज्याला ख्रिसमस भेट दिली आहे.
बंगालने नाणेफेक जिंकून गोव्याला फलंदाजीला पाचारण केले. गोव्याची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीची फलंदाज विनवी गुरव २ धावांवर बाद झाली. त्यानंतर सुगंधा घाडी (११) व निकिता मळीक (१२) यांची जोडी जमली, परंतु ही जोडी संघाच्या २७ धावा झाल्या असताना फुटली. त्या दोघी याच धावसंख्येवर बाद झाल्या. सुनंदा यात्रेकरने उपांत्य फेरीत कर्नाटकविरुद्ध नाबाद ४७ धावा फटकावल्या होत्या, परंतु यावेळी तिने निराशा केली. अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज सुनंदा या सामन्यात एकही धाव करू शकली नाही. त्यावेळी गोव्याच्या चार गडी बाद २८ धावा झाल्या होत्या.
एका बाजूने शिखा खेळत असताना दुसऱ्या बाजूने संजुला नाईक ९ धावांवर बाद झाली. त्यानंतर भारती गावकरने शिखाला चांगली साथ दिली. भारतीने ७८ चेंडूत ३२ धावा केल्या. शिखाने बंगालच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत आठ चौकार आणि एक षटकार हाणला. तिने ८९ चेंडूत ६६ धावा फटकावल्या. शिखा व भारतीने सातव्या विकेटसाठी मौल्यवान ८५ धावांची भागिदारी केली. गोव्याच्या महिलांनी ५० षटकात ९ गडी बाद १४७ धावा केल्या. बंगाल संघाने यापूर्वी लीग सामन्यात गोव्याला नमवले होते. त्या सामन्यात गोव्याला त्यांनी १३७ धावांचे आव्हान दिले होते. ते आव्हान त्यावेळी गोवा संघाला पेलवले नव्हते.
खरे तर आज गोव्याच्या महिलांचा दिवस होता. शिखाची उत्कृष्ट फलंदाजी तसेच संतोषी राणे आणि सुनंदा यात्रेकर यांची सुरेख गोलंदाजी यामुळे गोव्याच्या महिलांनी आजचा दिवस गाजवला. संतोषी व सुनंदा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले, तर निकिता मळीक, दिक्षा गावडे व संजुला नाईक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
शिखा पांडेची उत्कृष्ट कामगिरी
कर्णधार तथा भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू शिखा पांडेने या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करून संघाला सावरले. या स्पर्धेत शिखाने सर्वाधिक गडी बाद केले. सहा सामन्यात तिने १८ गडी बाद केले. मंगळवारच्या बंगालविरुद्ध अंतिम सामन्यात तिने आठ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ६६ धावा फटकावल्या व उत्कृष्ट गोलंदाजी केली. आठ षटकांत तिने पाच षटके निर्धाव टाकून फक्त पाचच धावा दिल्या.
महिला संघ
आज गोव्यात....
वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धेत शानदार प्रदर्शन करणाऱ्या गोव्याच्या महिला संघाचे बुधवारी (दि. २७) दुपारी गोव्यात आगमन होणार आहे. या संघाचे गोव्यात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी गोवा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गोवा महिला संघाच्या प्रशिक्षक देविका पळशीकर यांचे खास अभिनंदन करण्यात येत आहे.