मोपा पंचायतीसमोर आज ग्रामस्थांचे धरणे

शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी


16th December 2017, 05:01 am


वार्ताहर | गोवन वार्ता
धारगळ : मोपा येथील मराठी सरकारी शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटवून मैदान मोकळे करा, या मागणीसाठी पालक तसेच ग्रामस्थ शनिवार, दि. १६ रोजी मोपा पंचायतीसमोर सकाळी १० ते १ वाजेपर्यंत धरणे धरणार आहेत. याबाबतचे लेखी निवेदन पेडणे येथील उपजिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
मैदानावरील अतिक्रमण न हटवल्यास भविष्यात या शाळेवर विपरीत परिणाम होणार आहे, अशी भिती लोकांत व्यक्त केली जाते. गोवा मुक्तिदिनापूर्वी तेथील अतिक्रमण हटवून मुलांसाठी मैदान मोकळे करून द्यावे, अशी मागणी मोपा ग्रामस्थांनी तांबोसे-उगवे-‍मोपा पंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी एक भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी चार दिवसांचा कालावधी पंचायतीला दिला होता. त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने शनिवारी (दि. १६) सकाळी १० वाजल्यापासून मोपा येथील ग्रामस्थ पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.
गोवा मुक्तिदिनापूर्वीच अतिक्रमण हटवण्याची ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. या मैदानावर दगड ठेवून तसेच इतर अडचणींमुळे शाळेतील मुलांना गोवा मुक्तीदिन साजरा करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. दरवर्षी याच मैदानावर गोवा मुक्तिदिन साजरा केला जातो. तसेच याच मैदानावर वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा दिन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मैदानावर अतिक्रमण केल्यामुळे मुलांना भविष्यात कोणतेही कार्यक्रम करता येणार नाहीत.
मोपा येथील मराठी सरकारी शाळा सर्वगुणसंपन्न असून या शाळेत ६० विद्यार्थी आणि ७ शिक्षक आहेत. येथील मराठी शाळा भविष्यातदेखील चालू राहावी, असा मोपा येथील लोकांचा प्रामाणिक हेतू आहे. भविष्यात ही शाळा बंद पडल्यास छोट्या छोट्या मुलांना किमान चार कि.मी.पेक्षा अधिक अंतर चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागणार आहे. याची चिंता ग्रामस्थांना लागून राहिली आहे. गावातील जमीनमालक असलेल्या पूर्वजांनी येथील जमीन शाळेसाठी दिली होती. आतापर्यंत तीन पिढ्यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. मात्र, ही जमीन पूर्वजांनी तोंडी दान दिली होती. त्याचे आता उलट परिणाम दिसून येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शाळेसमोरच्या मैदानावरील अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी मोपा येथील ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शनिवारी सकाळी पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मुक्तिदिनापूर्वी अतिक्रमण न हटविल्यास उपोषण
गेल्या महिन्यापासून मोपा मराठी सरकारी शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविण्यासाठी येथील ग्रामस्थांचे व पालकांचे आंदोलन सुरू आहे. मराठी शाळा बंद पडू नये याची काळजी ग्रामस्थांना लागून राहिली आहे. मात्र, अद्याप याची कोणीही गांभीर्याने दखल घेत नाही. दि. १९ डिसेंबरपूर्वी अतिक्रमण न हटवल्यास उपोषणास बसणार, असा इशारा ग्रामस्थांनी पेडणे येथील उपजिल्हाधिकारी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.