कोची येथे आज नॉर्थईस्टविरुद्ध केरळा ब्लास्टर्सची लढत

विजय मिळवण्याची ब्लास्टर्सला संधी


15th December 2017, 03:37 am
कोची : हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी केरळा ब्लास्टर्स आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात लढत होणार आहे. ब्लास्टर्सच्या संघातील अनेक खेळाडू तसेच सहाय्यक प्रशिक्षक थांगबोई सिंगटो हे सुद्धा ईशान्येकडील आहेत. साहजिकच प्रतिस्पर्ध्यांविषयी त्यांच्याकडे आतल्या गोटातील माहिती आहे. अशावेळी नॉर्थईस्टला हरवून विजयाचा दुष्काळ संपविण्याची चांगली संधी ब्लास्टर्सला आहे.
स्पर्धेत आतापर्यंत विजय मिळवू न शकलेल्या दोन संघांमध्ये ब्लास्टर्सचा समावेश आहे. एटीकेप्रमाणेच त्यांना प्रतीक्षा आहे. ब्लास्टर्सचा विजयाचा क्षण नजीक आल्याचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांना वाटते. नॉर्थईस्टविरुद्ध त्या भागातील खेळाडूंमुळे विजयाच्या आशा पल्लवित झाल्यासारखे त्यांना वाटते.
सिंगटो पूर्वी शिलॉंग लाजॉंगचे प्रशिक्षक होते. त्यांना असलेल्या त्या भागातील खेळाडूंच्या विपुल माहितीचा बराच फायदा होईल, असे म्युलेस्टीन म्हणाले. त्यांनी सांगितले की, ईशान्येकडील खेळाडूंचा संच खास महत्त्वाचा आहे. या लढतीचा तो एक वेगळा पैलू आहे. विशिष्ट खेळाडू आणि त्यांच्या खेळाचे विशिष्ट गुण याबाबतीत सिंगटोची आम्हाला बरीच मदत होईल. आम्ही त्याचा फायदा उठवू शकू अशी आशा आहे.
ब्लास्टर्सकडे ईशान्येकडील सात खेळाडू आहेत. त्यामुळे ही जणू काही डर्बी असल्याचीच भावना निर्माण झाल्याचे म्युलेस्टीन यांनी नमूद केले. ही लढत भावनात्मक ठरू शकते, पण खेळाडूंनी भावनेचा खेळावर परिणाम होऊ देता कामा नये. आम्ही आखलेल्या डावपेचांनुसार खेळ करणे महत्त्वाचे असेल. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
म्युलेस्टीन यांच्यासाठी दिमीतार बेर्बातोव दुखापतीमुळे अनुपलब्ध असेल, पण सी. के. विनीत, वेस ब्राऊन आणि इयन ह्युम यांचे ते स्वागत करतील.
नॉर्थईस्टचे प्रशिक्षक जोओ डे डेयूस यांनी सुद्धा प्रतिस्पर्धी संघातील ईशान्येच्या खेळाडूंविषयी ऐकले आहे. याशिवाय कोचीमध्ये तीन वर्षे जिंकता आलेले नाही याची सुद्धा त्यांना कल्पना आहे. यानंतरही या मुद्यांचा सामन्यावर मोठा परिणाम होईल असे त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे ते गडबडून गेलेले नाहीत. सिंगटो यांना असलेल्या माहितीमुळे निर्णायक फरक पडेल का या प्रश्नाचे त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
डेयूस यांनी सांगितले की, त्यांना माझे सगळे खेळाडू माहिती असतील, पण त्यांना खेळाविषयी माझ्या कल्पना माहिती आहेत का? माझे खेळाडू प्रशिक्षकांच्या कल्पनेनुसार खेळतील. हा काही उघड भाष्य करण्याचा विषय नाही.
नॉर्थईस्टला मागील सामन्यात घरच्या मैदानावर बेंगळुरू एफसीविरुद्ध दुर्दैवी पराभव पत्करावा लागला. डेयूस यांच्यामते त्यांना किमान एक गुण मिळायला हवा होता, पण गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याची घोडचूक भोवली. त्यांनी सांगितले की, त्या सामन्यापूर्वी वॉर्म-अप करताना रेहेनेशला दुखापत झाली. तो उजव्या पायाने चेंडू मारू शकत नव्हता. बेंगळुरूविरुद्ध त्याच्याकडून चूक झाली तेव्हा त्याने डाव्या पायाने चेंडू मारला होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. तो खेळेल आणि उजव्या पायाने चेंडू मारेल.
गुणतक्‍त्यात नॉर्थईस्ट चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. ब्लास्टर्स तीन गुणांसह त्याखाली एक क्रमांक आहे.