गोव्यातील आणखी एकाला अपहरण करून लुटले !


15th December 2017, 03:14 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गोव्यातील चार युवकांचे कागल (कोल्हापूर) येथे अपहरण करून नंतर सोडून दिल्याची घटना ताजी असतानाच वेरे-बार्देश येथील महालिंगाप्पा गुट्टाकरी (वय ४२, मूळ हुबळी) यांचेही १० डिसेंबर रोजी निपाणी-आजरा परिसरात अपहरण करून त्यांना पिस्तुल व चॉपरच्या धाकाने दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.
महालिंगाप्पा गुट्टाकरी यांनी १२ रोजी पेडणे पोलिस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी १३ रोजी अज्ञात ८ ते १० संशयितांविरुद्ध झिरो एफआयआर दाखल करून अपहरण व दरोड्याचे हे गुन्हा प्रकरण कोल्हापूर पोलिस अधीक्षकांकडे वर्ग केले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुट्टाकरी हे मार्केटिंग एजंट आहेत. कामानिमित्त त्यांचा गोवा-पुणे असा कायम प्रवास असतो. घटना घडली तेव्हा ते आपल्या जीए. ०९, डी. २४१८ क्रमांकाच्या फियाट कारने पुण्याहून गोव्याला येत होते. पहाटे तीनच्या सुमारास ते निपाणी जंक्शनपासून १० किलो मीटर अंतरावर आले असता, त्यांच्या कारला इंडिका कारमधून आलेल्या संशयित दरोडेखोरांनी अडविले. त्यात २५ ते ३० वयोगटातील ८ ते १० जणांचा समावेश होता. त्यानंतर संशयितांनी गुट्टाकरी यांना चॉपर व पिस्तुलचा धाक दाखवत त्यांच्या तोंडावर बुरखा घालून त्यांचे अपहरण केले तसेच त्यांच्याजवळ असलेले १ लाख ५५ हजार ७५० रुपये, मोबाईल व मनगटी घड्याळ काढून घेतले. त्यानंतर त्यांना दोन दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवण्यात आले व १२ रोजी पहाटे १.३० वाजता त्यांना त्यांच्या कारसह सोडून दिले. या प्रकाराने घाबरलेल्या महालिंगाप्पा यांनी १२ रोजी सकाळी गोव्यात दाखल होताच पेडणे पोलिस स्थानकात धाव घेत पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पेडणे पोलिसांनी महालिंगाप्पा यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या ३४१, ३९५, व ३४२ तसेच बंदूक कायदा कलम ३ व २७ नुसार शून्य (झिरो) एफआयआरखाली गुन्हा नोंद केला व हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग केले आहे.
दोन्ही अपहरण प्रकरणे एकाच टोळीकडून?
शिर्डी येथे देवदशर्नासाठी गेलेल्या डांगी कॉलनी-म्हापसा येथील राहुल धारगळकर व ज्ञानेश्वर गोकाक्कर आणि मये-डिचोली येथील मनोज गावकर व सावळो गावकर यांचेही १० रोजी अशाच पद्धतीने कोल्हापूरनजीक असलेल्या कागलमध्ये अपहरण करण्यात आले होते. महालिंगाप्पा गुट्टाकरी यांचे अपहरणही १० रोजीच झाले होते. युवकांच्या अपहरण प्रकरणातील पाच संशयितांची पोलिसांनी ओळख पटविली असून, हे पाचही संशयित सराईत गुन्हेगार असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, ही दोन्ही अपहरण प्रकरणे एकाच टोळीने केली असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.