वेर्णा येथील खून प्रकरणी एकाला जन्मठेप


30th December 2017, 03:15 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
मडगाव : वेर्णा येथील शिवा भक्ती (२५) याच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या देव बिस्वास (२५) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ६ जुलै २०१५ रोजी घडली होती.
जिल्हा न्यायालयाने आरोपीला खून प्रकरणी १० हजार रुपये दंड व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी १० हजार रुपये मिळून २० हजार रुपये दंड सुनावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एकंदर ४ महिने अतिरिक्त सक्त मजुरीची शिक्षा भोगावी. तसेच दंडाची रकम भरल्यास मृत शिवा भक्ती यांच्या कुटुंबीयांना देण्यात यावी, असे प्रधान न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी आदेशात नमूद केले आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी की, ५ जुलै २०१५ रोजी आरोपीने आपल्या बॅगेतील १२०० रुपये शिवाने काढल्याचा आरोप केला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्या वैमनस्यातून रात्रीच्या वेळी उभयतांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी आरोपीने शिवा भक्ती याला जबर मारहाण केली. त्याच्या छातीत सुरा खुपसून गंभीर जखमी केले. नंतर हॉटेलातील गॅस सिलिंडर आणून त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा केल्याने तो जागीच गतप्राण
झाला.
वेर्णा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी या खून प्रकरणाचे तपासकाम करून आरोपीला दुसऱ्या दिवशी अटक केली. त्या दिवसापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या खून प्रकरणी न्यायालयाने १५ साक्षीदारांच्या जबान्या नोंदवून घेतल्या आहेत. सरकारी पक्षातर्फे एल. फर्नांडिस यांनी युक्तिवाद केला.