एमपीटी धक्क्यांचा पुनर्विकास लांबणीवर

सीआरझेडने प्रस्ताव पुढे ढकलला, ड्रेजिंगविषयी मागितले स्पष्टीकरण


22nd November 2017, 03:49 am


विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : स्थानिक मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या (एमपीटी) ८ आणि ९ क्रमांकाच्या धक्क्यांचा पुनर्विकास लांबणीवर पडला आहे. धक्क्यांचा पुनर्विकास करण्याच्या हेतूने तयार केलेल्या पर्यावरण परिणाम अहवालाचा अभ्यास करण्यासाठी गोवा किनारी क्षेत्र विकास प्राधिकरणाने वेळ मागितल्यामुळे पुढील बैठकीत हा प्रस्ताव येणार आहे. दरम्यान, एमपीटीने मोठी जहाजे बंदरात आणण्यासाठी नदीचे ड्रेजिंग करण्यासाठीही परवानगी मागितली होती त्याविषयी एनआयओने दिलेला अभ्यास अहवाल सादर करा, असे म्हणत प्राधिकरणाने तो प्रस्तावही पुढे ढकलला आहे.
८ आणि ९ क्रमांकाच्या कार्गो धक्क्यांचा आणि बार्ज लागतात त्या धक्क्याचा सार्वजनिक खासगी भागिदारीवर (पीपीपी) पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आहे. ८ क्रमांकाच्या धक्क्यावर पेट्रोलियम, अमोनिया असे कार्गो हाताळले जातात तर ९ क्रमांकाच्या धक्का लोह खनिज हाताळणीसाठी आहे.
दरम्यान, एमपीटीने बंदरात मोठी जहाजे आणण्यासाठी नदीच्या पात्रात ड्रेजिग करून पात्र खोल करण्याच्या कामासाठी प्राधिकरणाकडून परवानगी मागितली होती. २०१५ पासून हा प्रस्ताव सीआरझेड मंजुरीसाठी आहे.
प्राधिकरणाच्या बैठकीत सदस्यांनी एमपीटीने या संदर्भात लेखी माहिती द्यावी तसेच एनआयओकडून जो अभ्यास करून घेतला आहेत, त्याचा अभ्यास अहवाल सादर करावा, असे एमपीटीला सांगितले. त्यामुळे पुढच्या बैठकीत या प्रस्तावावर विचार केला जाईल असे प्राधिकरणाने म्हटले आहे.