डिचोलीत शिवाजी महाराज मैदानाचे नूतनीकरण

शिवरायांच्या सद्गुणांचा जीवनात शिडकाव करा


22nd November 2017, 03:48 am
डिचोलीत शिवाजी महाराज मैदानाचे नूतनीकरण
प्रतिनिधी | गोवन वार्ता
डिचोली : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना या महापुरुषाची ओळख नव्या पीढीला होण्याची गरज असून त्यांची विविध क्षेत्रातील कीर्ती व त्यांचे गुण प्रत्येकाने आत्मसात करायला हवे. एवढ्या मोठ्या थोर पुरुषाच्या नावाने डिचोलीत छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे ऐतिहासिक असून त्याचा योग्य वापर करावा, तसेच त्याची योग्य निगा राखा. सतत शिवरायांच्या सद्गुणांचा जीवनात शिडकाव करा, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी डिचोलीत केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुमारे २ कोटी खर्चून साकारण्यात आलेल्या नूतनीकृत मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डिचोली पालिका व कोमुनिदाद यांनी मैदानाबाबत कोणतेही मतभेद असतील तर सांगावे. सरकार कामुनिदादला या जागेची पूर्ण रक्कम देण्यास तयार अाहे. त्याबाबत चर्चा करून हा विषय कायमचा निकालात काढा, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. या मैदानासाठी आपल्याला कोणताच वाद असू नये, असे वाटते असे सांगून मैदानाची निगा राखण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
व्यासपीठावर मंत्री गोविंद गावडे, आमदार राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष राजाराम गावकर, चैतन्य तेली, अजित बिर्जे, गुरुदास पळ, वल्लभ साळकर, सुदन गोवेकर, हरिष हडकोणकर, कामुनिदादचे श्यामू गावकर, दिनेश गावकर, कृष्णा गावकर, सांबा गावकर सर्व नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोविंद गावडे यांनी मैदानातील शिवाजी महाराजांची जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष राजाराम गावकर यांनी स्वागत केले. राजेश पाटणेकर यांनी या मैदानाचे नूतनीकरण हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.
यावेळी दोन प्रदर्शनीय सामने खेळण्यात आले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फुटबॉलला किक मारून केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. डिचोलीच्या मैदानाचे उद्घाटन झाल्याने क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला.