शिक्षक- विद्यार्थी प्रमाणाचे निकष चुकीचे !

प्रा. संजय देसाई यांचा अभ्यासाव्दारे दावा


22nd November 2017, 03:48 am
शिक्षक- विद्यार्थी  प्रमाणाचे निकष चुकीचे !

प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : शिक्षण खात्याकडून जारी केलेल्या माहितीनुसार राज्यातील प्राथमिक स्तरावर २४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण आहे. प्रा. संजय देसाई यांनी सांगे तालुक्यातील प्राथमिक शाळा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येचा अभ्यास करून या प्रमाणाचे सरकारचे निकष पूर्णपणे चुकीचे आहेत आणि यांत त्वीरत सुधारणा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली
आहे.
शिक्षण खात्याकडून २०१६-१७ या वर्षींचा अहवाल सादर केला असता त्यात शिक्षक-पालक प्रमाण १:२४ असल्याचे म्हटले आहे. प्राथमिक स्तरावर राज्यातील सरकारी अाणि अनुदानीत शाळा मिळून ९६, ४६७ विद्यार्थी आहेत तर ४०१७ शिक्षकांची नोंद आहे. या प्रमाण निकषांचा अभ्यास करण्यासाठी प्रा. संजय देसाई यांनी सांगे तालुका निवडला. सांगे तालुक्यात एकूण ५६ प्राथमिक शाळा असून तिथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग चालतात. या वर्गांत मिळून एकूण १३२६ विद्यार्थी शिकतात. सरकारकडून या शाळांसाठी ९२ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शिक्षकांचे हे प्रमाण पाहिले तर १४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे होते जे सर्वसाधारण प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने चांगले म्हणावे
लागेल.
या एकूणच गोष्टीच्या तळाशी गेले असता एक वेगळेच सत्य उजेडात आल्याचे प्रा. संजय देसाई यांनी म्हटले आहे. सांगेतील ५६ शाळांमध्ये प्रत्येकी पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग चालतात. या सर्व वर्गांची बेरीज केली तर ती २२४ वर्ग बनतात. प्रत्येक इयत्तेला किमान चार विषय आहेत आणि त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला किमान १६ विषय शिकवणे गरजेचे आहे. सरकारच्या २४ विद्यार्थ्यामागे एक शिक्षकाच्या प्रमाणाचे जे निकष आहेत ते पूर्णपणे अव्यवहार्य
आहेत.
प्रत्येक इयत्तेसाठी एक शिक्षक असणे गरजेचे आहे तरच या निकषाला अर्थ आहे. या प्रमाणे सांगे तालुक्याचेच उदाहरण घेतल्यास इथे २२४ शिक्षकांची गरज आहे तरच विद्यार्थी शाळेच्या वेळेत पूर्णपणे व्यस्त राहू शकतात. एक शिक्षकी शाळेत एकाच वेळी चार इयत्तांमधील विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत आपल्या उज्ज्वल शिक्षणासाठी कशी काय परवडू शकेल,असा सवाल प्रा.संजय देसाई यांनी
केला.