दप्तरासंबंधी​ वास्कोत लवकरच बैठक

मुरगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती : परिपत्रकाची माहिती देणार


22nd November 2017, 03:47 am
दप्तरासंबंधी​ वास्कोत लवकरच बैठक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासंबंधी शिक्षण खात्याने एका वर्षापूर्वी पाठविलेल्या परिपत्रकाची आठवण वास्कोतील शैक्षणिक यंत्रणेला आता आठवण झाली आहे. मुरगाव पालिका मंडळाचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी भाग शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन व पालक- शिक्षक संघांची बैठक बोलवण्याचे ठरविले आहे.
शिक्षण खात्याने ७ नोव्हेंबर २०१६ रोजी शाळा प्रमुख, अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व विशेष शाळांना परिपत्रक पाठवून दप्तराचे वजन कमी करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्के पेक्षा ते जास्त असू नये, असे कळविले होते. पूर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके आणण्यास सांगू नये तसेच विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसारच पुस्तके आणण्यास सांगावे. त्यासंबंधी पालकांमध्ये जागृती करावी, अशी सूचना परिपत्रकात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी शाळेतच पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून देता येईल काय, याची पाहणी करण्यास शाळा व्यवस्थापनाला सांगितले होते.
पालक, शिक्षक व संबधित अधिकारी यांनी प्रयत्न केल्यास दप्तरांचे ओझे कमी करणे शक्य आहे. पालकांनी वेळापत्रकानुसार मुलांना पुस्तके नेण्यास सांगायला हवे. विद्यार्थ्यांनी बसमध्ये बसण्यास जागा नसल्यास सीटच्यावर असलेल्या कंपार्टमेन्टमध्ये दप्तर ठेवावे. पाण्याची फॅन्सी बाटली, टिफीन व कंपास बॉक्समुळेही वजन वाढते, असे सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक सुचेता परब यांनी सांगितले.
पालकांना परिपत्रकाची माहिती द्यावी : नाईक
दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत तक्रार आल्यास सबंंधितांवर कडक कारवाई करण्याच इशारा शिक्षण खात्याने दिला होता. आम्ही पुस्तकांचा एक संच शाळेतील कपाटात ठेवतो. दप्तराचे वजन तपासून पाहण्यासाठी भाग शिक्षण अधिकाऱ्यांनी (एडीईआय) आकस्मिक तपासणी करावी व पालक -शिक्षक संघाने पालकांची बोलून त्यांना परिपत्रकाची माहिती द्यायला हवी, असे पालिका शाळेच्या मुख्याध्यापक शारदा नाईक यांनी गोवन वार्ताशी बोलताना सांगितले.