तेजपाल प्रकरणी सुनावणी ९ जानेवारी रोजी

दोषारोप निश्चित


22nd November 2017, 03:43 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : सहकारी महिला पत्रकारावर बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी तेहलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल न्यायालयात हजर न राहिल्याने येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजया पोळ यांनी या प्रकरणाची सुनावणी येत्या ९ जानेवारी रोजी निश्चित केली आहे.
गेल्या दि. २८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३४१ (बेकायदा निर्बंधात ठेवणे), ३४२ (कोंडून ठेवणे), ३५४ (ए) (महिलेच्या सलज्जतेला धोका निर्माण करणारे कृत्य करणे), ३५४ (ब) (मारहाण करून जबरदस्तीने विवस्त्र करणे), ३७६ (१) (२) (एफ) (के) (उच्चपदावरील व्यक्तीकडून बलात्कार) या कलमांखाली दोषारोप निश्चित केले.
गेल्या नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये आपल्या सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशयिताविरुद्ध आरोप आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी दि. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संशयित आरोपी तरुण तेजपाल यास अटक केली होती.
गेल्या दि. १ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या सुनावणीचा स्थिती अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने मंगळवारी सुनावणी निश्चित केली होती. मात्र, या सुनावणीवेळी संशयित आरोपी आजारी असल्याने न्यायालयात हजर न राहिल्याने सुनावणी पुढे ढकलली आहे. आपला अशील आजारी असल्याने डॉक्टरांनी त्यास ८ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते प्रवास करू शकत नाही. यासंबंधीच्या वैद्यकीय दाखल्याची प्रत न्यायालयात सादर करून आपल्या अशिलाला न्यायालयात हजर न राहण्याची सुट देण्याचा अर्ज करण्यात आला आहे. पुढील सुनावणी येत्या ९ जानेवारी रोजी होणार आहे. आपल्या अशिलाविरुद्ध दाखल करण्यात आलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून फेटाळली जाईल, असा दावा करून आपल्या अशिलाच्या छळवणुकीसाठी प्रत्येक वेळी त्यांना न्यायालयात हजर राहण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात असल्याचे तरुण तेजपालचे वकील अॅड. राजीव गोम्स यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संशयिताने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी येत्या दि. १२ डिसेंबर रोजी होणार आहे.